
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर ‘महाविकास’ आघाडीचा झेंडा फडकावून त्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचाच असेल.
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवा, मात्र आवश्यक त्या ठिकाणी मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेऊन महाविकास आघाडीचा झेंडा फडकवावा व याच यशाच्या बळावर आगामी लोकसभेत जळगावचा खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचाच असेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शिवसेनेचा जिल्हा मेळावा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते, तर संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविक केले.
काँग्रेस, राष्ट्रवादीशी जळवून घ्या
गुलाबराव पाटील म्हणाले, की ग्रामपंचायत निवडणुकीवरच जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेचे राजकारण अवलंबून असते. त्यामुळे ज्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका असतील त्या ठिकाणी शिवसैनिकांनी जास्तीत जास्त शिवसेनेच्या विचारांचे सदस्य निवडून येतील याकडे लक्ष द्यावे. तसेच ज्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे कमी वर्चस्व असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी समझोता करून ‘महाविकास’ आघाडीचे वर्चस्व राहील यासाठी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर ‘महाविकास’ आघाडीचा झेंडा फडकावून त्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचाच असेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
भाजपचे संख्याबळ कमी करावे : सावंत
जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, की ग्रामपंचायत निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’च्या जास्तीत जास्त सदस्यांना निवडून आणावे. राज्यातील महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा करून ग्रामपंचायत निवडणूक लढवून यश मिळवावे. राज्यात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती केली, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर गद्दारी केली. ज्यांनी २४ वर्षे आपल्यासोबत मैत्री केली परंतु निवडणुकीनंतर आपल्यावर विश्वास ठेवला नाही, मात्र ज्यांनी आपल्याशी २४ वर्षे वैर केले परंतु निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आपल्याशी गद्दारी केलेल्या भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ ग्रामपंचायतीत कमी करून महाविकास आघाडीला यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
काँग्रेस, राष्ट्रवादीशी जुळवून घ्या : आमदार पाटील
आमदार किशोर पाटील म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेने जुळवून घेतले होते. मात्र त्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसैनिकांनी नवीन राजकीय वातावरणाशी जुळवून घ्यावे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहतील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.