ग्रामपंचायत निवडणुकीत दहा हजार अर्जांचा पाऊस: आज छाननी !

ग्रामपंचायत निवडणुकीत दहा हजार अर्जांचा पाऊस: आज छाननी !

जळगाव  : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत किती अर्ज भरले हे मोजण्याचे काम सर्वच तहसील कार्यालयांत सुरू होते. सुमारे दहा हजार अर्जांचा पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान आज (ता. ३१) उमेदवारी अर्जांची छाननी आहे.

बुधवारी सर्वच तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केल्याने तहसील कार्यालयांना यात्रेचे स्वरूप आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी झालेला गोंधळ पाहता बुधवारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले. सोबतच अर्ज भरण्यास सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ वाढवून मिळाला होता. यामुळे सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी सहानंतरही तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धांदल उडाली होती. 

चुरशीच्या होणार लढती

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण पाच हजार ८२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीचा रंग चढला आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. 

आतापर्यंत तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज 
जळगाव ७३०, जामनेर १,२६१, एरंडोल ६१४, भडगाव ६४८, रावेर ६६५, बोदवड ४०५, भुसावल ५२०, पारोळा १,१०९, यावल ७४८, चोपडा ७६५, मुक्ताईनगर ७९१. 

निवडणूक कार्यक्रम असा 
छाननी : ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्हवाटप : ४ जानेवारी २०२१ 
मतदान : १५ जानेवारी 


नशिराबादची निवडणूक होणार 
नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याचा शासनाने निर्णय घेतला असला, तरी परिषद स्थापन होण्यास बराच कालावधी लागेल. निवडणूक आयोग जोपर्यंत नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकीस स्थगिती देत नाही तोपर्यंत या ग्रामपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया सुरूच राहील, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com