सदस्यांची अनुपस्थितीमूळे पदग्रहणापासूनच ग्रामपंचायतीला लागले ‘ग्रहण’ 

सदस्यांची अनुपस्थितीमूळे पदग्रहणापासूनच ग्रामपंचायतीला लागले ‘ग्रहण’ 

चोपडा : चहार्डी (ता. चोपडा) येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा पदग्रहण सोहळा व घंटागाडीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पदग्रहण करण्यासाठीही उपसरपंचासह अनेक ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती. यामुळे पदग्रहणापासूनच ‘ग्रहण’ सुरू झाल्याचे बोलले जात आहे. उपसरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी अनुपस्थित राहून पदग्रहण केलेच नाही. यामुळे सुरवातीपासूनच गावाच्या विकासाला ग्रहण लागते की काय? हे ग्रहण कोण आणि कसे सोडविणार.?याबाबत चर्चा सुरू आहे. 


ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी प्रशासक भार्गव साळुंखे यांनी सरपंच चंद्रकला दत्तात्रेय पाटील यांना पदभार सोपविला. मात्र, तद्नंतर उपसरपंच तुळशीराम कोळी हे अनुपस्थित राहिल्याने त्यांचे पदग्रहण झाले नाही. या वेळी काही सदस्यही अनुपस्थित होते. 

गावाच्या विकासाला लागणार ब्रेक
चहार्डी येथील सरपंचपदाच्या निवडीपासून गावात धुसफूस सुरू आहे. याचे कारण म्हणजे १७ सदस्य असलेल्या चहार्डी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडप्रसंगी आमनेसामने दोन गट होते. एका गटात नऊ सदस्य तर दुसऱ्या गटात आठ सदस्य होते. ऐनवेळी एक सदस्य फुटल्याने आठ सदस्य असलेल्या गटातील ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला पाटील या सरपंचपदाच्या दावेदार झाल्या तर दुसऱ्या गटाचे तुळशीराम कोळी हे उपसरपंच म्हणून निवडून आले असले तरी मनोमन अंतर्गत विरोधीपणा असल्याने गावाच्या विकासासाठी एकजूट होईल की नाही? हा प्रश्न चहार्डीवासीयांना अनुत्तरित आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरळ दोन गट तयार झाले असून, गावाच्या विकासाला ब्रेक लागणार, हे निश्चित मानले जात आहे. 

धुरा महिलेच्या हाती

पुरस्कार प्राप्त चहार्डी गावाची धुरा महिलेच्या हाती आली आहे. त्या ही धुरा किती यशस्वीपणे सांभाळतील हा येणारा काळच सांगणार आहे. 

घंटागाडीचे लोकार्पण 
वसुंधरा अभियानांतर्गत चहार्डी ग्रामपंचायतीला घंटागाडी प्राप्त झाली असून, या घंटागाडीचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या प्रा. नीलम पाटील, सभापती मालुबाई रायसिंग, सरपंच चंद्रकला पाटील, प्रशासक भार्गव साळुंखे, उपसरपंच तुळशीराम कोळी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी एस. आर. पारधी आदींच्या उपस्थितीत झाले. 

 समान न्याय देवू
पदग्रहण कार्यक्रमप्रसंगी घंटागाडीचे लोकार्पण झाले असून, महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गावाला स्मार्ट गाव तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला असून, यापुढेही पुरस्कार मिळविण्यासारखे काम केले जाईल, असे मत नवनियुक्त सरपंच चंद्रकला पाटील यांनी तर डॉ. अनिल पाटील यांनी निष्पक्षपणे कामे केले जातील सर्व वॉर्डास समान न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी बाजार समितीचे संचालक भरत पाटील, चोसाका संचालक नीलेश पाटील आदी उपस्थित होते.  

पदग्रहणासाठी यांची होती अनुपस्थिती 

गुरुवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य पदग्रहण कार्यक्रमास उपसरपंच तुळशीराम कोळी, हर्षदा कोळी, अर्जुन कोळी, दिनकर पाटील, गणेश पाटील, जयश्री पाटील, माधुरी सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील हे सदस्य अनुपस्थित होते. यामुळे एवढे निम्मे सदस्य अनुपस्थित राहिल्याने विकासाला खीळ बसेल की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com