
रस्त्याच्या कामाला महामार्ग विभागाचा ‘ब्रेक’
जळगाव : शिवाजीनगर पुलाच्या होत असलेल्या कामामुळे शिवाजीनगरातील नागरिक त्रस्त झाले आहे. पर्यायी मार्ग असलेल्या रस्त्याच्या कामाला महामार्ग विभागाचे अधिकारी हिरवा कंदील देण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे धुळीवर पाणी मारून उपाय करण्यात येत असला तरी तोही बेभरवशी आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
शिवाजीनगर पुलाच्या काम गेल्या तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे, त्याचे काम लवकर व्हावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. या विलंबामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. दुसरीकडे या पुलाला शिवाजीनगरातील लाकूड पेठ, क्रांती चौक, टी. टी. सांळुखे चौक ते थेट ममुराबाद रस्त्यापर्यंत हा पर्यायी रस्ता आहे. मात्र हा रस्ता अत्यंत खराब आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून याच रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे धूळही उडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
धुळीवर पाण्याचा बेभरवशी उपाय
लाकूड पेठ ते थेट ममुराबाद मार्गाला जोडणाऱ्या या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे, त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी मागणी केल्यामुळे रस्त्याचे काम होईपर्यंत धुळ रोखण्यासाठी पाणी मारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे वाहन कधी येते तर कधी येतच नाही, अनेक वेळा संपर्क गेल्यानंतर ते वाहन पाणी मारण्यास येते अशी नागरिकांची तक्रार आहे.
पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करून देण्यास पुलाचा मक्तेदार तयार आहे. मात्र महामार्ग विभाग त्यास मंजुरी देण्यास तयार नाही, त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता शिवाजीनगरातील कार्यकर्ते या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी महामार्ग विभागाकडे गेले होते, त्यांनी हा रस्ता ठेकेदारांच्या माध्यमातून करून घ्यावा असे सांगितले, त्यानंतर पुलाच्या ठेकेदाराने त्याची तयारीही दर्शविली आहे, मात्र आपल्याला महामार्ग विभागाचे काम करण्याचे लेखी पत्र हवे आहे, असे सांगितले. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यानी लेखी पत्र देण्यास नकार दिला, त्यामुळे या कामास ब्रेक लागला आहे.
शिवाजीनगर पुलाला पर्यायी मार्ग असलेल्या लाकूड पेठ भागातून जाणाऱ्या रस्त्याचे काम पुलाचा मक्तेदार करण्यास तयार आहे. आम्ही त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी तयारी दर्शविली आहे. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी पत्र त्वरित द्यावे.
- स्वप्नील साकळीकर, भाजप, शहर कार्यकारिणी सदस्य
Web Title: Highway Department Break Road Construction Work
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..