Latest Jalgaon News | रस्ते बनले नाहीत, कर परत करा; महापालिकेसमोर बेमुदत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sridhar Choudhary, a citizen of Shivajinagar, who is sitting on an indefinite hunger strike in front of the Municipal Corporation to demand the return of taxes due to non-construction of roads.

Jalgaon : रस्ते बनले नाहीत, कर परत करा; महापालिकेसमोर बेमुदत उपोषण

जळगाव : मागील दहा वर्षांत महापालिकेने शिवाजीनगरातील एकही रस्ता बनविलेला नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर उशिरा भरला तर आम्हाला दंड होतो, मात्र आमच्या करातून रस्ते होत नसतील आमचा कर परत करा, या मागणीसाठी शिवाजीनगरातील नागरिक श्रीधर विष्णू चौधरी सोमवार (ता. ३१)पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. (Indefinite hunger strike in front of jalgaon Municipal Corporation for road construction by shivaji nagar citizen Latest Jalgaon News)

याबाबत दिलेल्या पत्रकात श्रीधर चौधरी यांनी म्हटले आहे, की मागील दहा वर्षांत शहरातील शिवाजीनगर भागात महापालिकेने एकही रस्ता बनविलेला नाही. आम्ही रहिवासी कर तर देतो, नाही दिला किंवा उशीर झाला तर दंड आकारणी केली जाते.

मग हा कराचा पैसा तसेच राज्य सरकारकडून मिळालेला निधी कोठे जातो, याचा उलगडा होत नाही. जनतेकडून कर स्वरूपात घेण्यात येणारा कर हा जनतेला सुखसुविधा जर पुरवीत नसेल तर कर का घेतला जात आहे, असा प्रश्‍न पडला आहे.

अधिकारी, नगरसेवकांतर्फे जनतेला त्रास

जनतेकडून जमा झालेल्या निधीतून विकास होत नसेल तर हा निधी कोठे जातो आहे. तो गहाळ होत आहे काय, याबाबत गुन्हा नोंदविण्यात यावा, असे मतही श्री. चौधरी यांनी व्यक्त केले. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. शिवाजीनगरात गेल्या अनेक वर्षांपासून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी व नगरसेवक सहमतीने जनतेला त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: Dada Bhuse | मुंबई महामार्गाची 8 दिवसांत दुरुस्ती करा : पालकमंत्री दादा भुसेंचे निर्देश

बरेवाईट झाल्यास मनपा जबाबदार

जनतेने भरलेला दहा वर्षांच्या कराचा पैसा महापालिकेने परत करावा या मागणीसाठी आपण आजपासून महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर बेमुदत उपोषण करीत आहोत, यात शिवाजीनगरवासीयांसह काही सहकारी सोबत आहेत. महापालिकेने दहा वर्षांचा कर प्रत्येक नागरिकाला व्याजासह परत करावा.

राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची तुम्ही परस्पर वाटणी करून घेतल्यास, तुमच्या खासगी संपत्तीतून वर्ग करून घेतल्यास आमची काहीएक तक्रार राहणार नाही. मात्र उपोषणात आमचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी महापालिकेवर असेल, त्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असतील, असेही श्री. चौधरी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Anandacha Shidha : मुख्यमंत्र्यांना Tweet अन् शिधा मिळाला!