
‘महागाई’ मोदी सरकारचे ‘गिफ्ट’ : खासदार सुप्रिया सुळे
जळगाव : देशभरात वाढत्या महागाईचा प्रश्न गंभीर आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याचे त्यांनी हे जनतेला ‘गिफ्ट’ दिले आहे. मात्र, यावर आता देशातील मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून मार्ग काढण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की वाढत्या महागाईवर केंद्र सरकारने चर्चा करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार विनंती केली. मात्र, त्यांनी एकदाही चर्चा घेतली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाई कमी करून जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा: 14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!
केंद्राने जीएसटीचे पैसे द्यावेत
महागाई कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, की राज्य सरकारने सीएनजीवरील एक हजार कोटी रुपयांचा कर कमी केला आहे. आणखी महागाई कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी केंद्राने आमचे जीएसटीचे पैसे द्यावेत, तसेच जीएसटीवरील सेस कुठे खर्च होतो, याची माहिती द्यावी. आम्ही संसदेत अनेकवेळा याबाबत प्रश्न विचारले. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्याबाबत आम्हाला अद्यापही उत्तर दिलेले नाही. केंद्र सरकारने याबाबत उत्तर द्यावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
महिलावर हात उचलणे चुकीचे
पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर हात उगारला. याबाबत त्या म्हणाल्या, की पुरुष कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यावर हात उगारणे चुकीचेच आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असते, तरी आपण हीच मागणी केली असती. महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास आहे, ते चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील, असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: सोलर पिडीत शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत; 4 वर्षांपासून संघर्ष सुरु
मी घाबरले! फडणवीस सरकारचा ढाचा पाडतील
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकारचा ढाचा आपण पाडणार आहोत, असे विधान केल आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या उपहासात्मक म्हणाल्या, ‘मी खूप घाबरले आहे.’
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ॲड. रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
Web Title: Inflation Modi Governments Gift Criticized Mp Supriya Sule
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..