सावधान, कोरोना अद्याप गेलेला नाही | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : सावधान, कोरोना अद्याप गेलेला नाही

जळगाव : सावधान, कोरोना अद्याप गेलेला नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाचा प्रभाव जसा जसा कमी होऊ लागला आहे, तशी नागरिकांमध्ये कोरोना नियमांबाबत बेफिकिरी वाढलेली आहे. मास्क, शारीरिक अंतर आदींचा नागरिकांना विसर पडलेला दिसून येत आहे. युरोपीय देशांचा विचार करता तिथे कोरोनाचा पुन्हा प्रभाव वाढत आहे. त्याअनुषंगाने भारतातदेखील तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आरोग्य यंत्रणेकडून पूर्वतयारी सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी लसीकरण केलेले नाही त्यांना तातडीने लसी देणे, ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणे, बेडची सज्जता, लहान मुलांसाठी वेगळा वॉर्ड आदींच्या सूचना आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: उमरगा : एसटी बंदचा पटसंख्येवर परिणाम

३० लाख नागरिकांना लस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच जिल्ह्यातील ३० लाख ६० हजार ८६० नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. त्यापैकी २२ लाख ६८ हजार ८८५ नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर आठ लाख २१ हजार ९९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप चार लाख नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. त्यांनी एकही डोस घेतलेला नाही अशांना ‘हर घर दस्तक’ योजनेंतर्गत लसीकरण केले जात आहे. जो रुग्ण आढळला त्यांच्या घरी, घराच्या परिसरातील ज्यांनी लसीकरण केलेले नाही अशांना लस दिली जात आहे. जिल्ह्यात २६५ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. त्यासाठी आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामसेविक, शिक्षक यांसह विविध घटकांनी मदत घेऊन लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लस दिली जात आहे. दररोज सुमारे दहा हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत सर्वांना लसीकरण होईल, असे नियोजन आहे. लसीकरणामुळे नागरिकांना तिसऱ्या लाटेचा इफेक्ट होणार नाही.

ऑक्सिजन प्लांटला ट्रान्स्फॉर्मर जोडणी

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आले आहेत. हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारे बारा पीएसए प्लांट आहे, तर पाच लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे. जिल्ह्यात यावल वगळता सर्वच तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार आहेत. काही ठिकाणी प्लांटला ट्रान्स्फॉर्मर जोडण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यासाठी संबंधित वीज कंपनीला पत्र देऊन त्वरेने ट्रान्स्फॉर्मर जोडला जाणार आहे. लागलीच चाचणी घेऊन प्लांट सज्ज ठेवले जातील.

ऑक्सिजनची निर्मिती चारपट अधिक

रुग्णसंख्या वाढली, की ऑक्सिजन प्लांटही सुरू होतील. सुरवातीस मोहाडी येथे ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल. दुसऱ्या लाटेत ५० टन एवढा ऑक्सिजन दरदिवशी रुग्णांसाठी लागला होता. आता सर्वच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार झाल्याने दर दिवशी २४९ टन ऑक्सिजन तयार होणार आहे. यामुळे या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही.

loading image
go to top