
जळगाव शहराने घेतला मोकळा श्वास; पाचोरा येथील अतिक्रमणे जमीनदोस्त
पाचोरा : येथील पालिकेच्या वतीने सोमवारी (ता. १४) शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून, बाहेरपुरा भागातील मच्छीबाजार परिसरात प्रचंड फौजफाट्यासह जेसीबीद्वारे अतिक्रमणे काढण्यात आल्याने शहराचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे हटवणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले.
पाचोरा येथे शहरातील प्रमुख रस्ते व चौकात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढत असल्याने शहराचा श्वास कोंडला गेला. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, वादविवाद, अपघात, हानी असे प्रकार वाढून शहराचे सौंदर्य धोक्यात आल्यामुळे अनेकांनी पालिका प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी व तक्रारी केल्या होत्या. गेल्या आठवड्यात पालिकेने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. परंतु पुरेसा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर पडली. सोमवारपासून (ता १४) या मोहिमेला जोमाने प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्वच रस्ते व चौकातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबतच्या नोटीसा अगोदरच बजावण्यात आलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना आपली अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेऊन सूचित केले. त्या आधारे त्यांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका जीनचा परिसर मोकळा व प्रशस्त झाला आहे. बाहेरपुरा भागातील मच्छीबाजारापासून कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्याला सोमवारी सकाळपासून सुरूवात झाली.
दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, पालिकेचे सुमारे ५० कर्मचारी, पोलिस मुख्यालय जळगाव, पाचोरा, पहूर व पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांचा फौजफाटा तैनात करून अतिक्रमणे काढण्यात आली. काहींनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली तर आठवडे बाजारातील काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर त्या अतिक्रमणासंदर्भात पालिका प्रशासन निर्णय घेणार आहे. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अध्यक्ष कर अधीक्षक मराठे यांनी स्वतः उपस्थिती देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. शहराचा हार्ट मानल्या जाणाऱ्या भडगाव रोड भागातील नव्यानेच पेवर ब्लॉक बसवलेल्या ठिकाणी करण्यात आलेली अतिक्रमणे व या अतिक्रमणासाठी संबंधित घरमालकांनी केलेले सहकार्य याबाबतही संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून, ही अतिक्रमणे देखील काढण्यात येतील व ज्यांनी पालिकेच्या अखत्यारितील पेव्हर ब्लॉक बसवलेला भाग भाड्याने दिला असेल त्यांना व्यावसायिक कर आकारणी करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
‘जैसे थे’ होऊ नये?
या अतिक्रमण हटाव मोहिमेचे शांतताप्रेमी नागरिकांकडून कौतुक होत असून, अतिक्रमणे काढली पण ती पुन्हा ‘जैसे थे’ होऊ नयेत, यासाठी पालिकेने सजग राहावे, अशीही मागणी व अपेक्षा आहे.
Web Title: Jalgaon City Pachora Took Deep Breath Encroachment Landlord
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..