
जळगाव : मास्क वापराने 'अस्थमा रुग्णवाढीवर' अंकुश
जळगाव : अस्थमा रुग्णांमध्ये दर दहा वर्षांनी ५० टक्क्यांनी वाढ होत असते. परंतु, जळगाव शहरातील मागील दोन-अडीच वर्षातील वास्तव वेगळे आहे. जळगावातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे रूग्ण संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. मात्र कोरोना काळात मास्कचा वापर होत असल्याने या रूग्ण वाढीवर अंकुश देखील मिळाला असल्याची माहिती चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्नील चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जागतिक अस्थमा दिन हा मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी साजरा केला जात असतो. या अनुषंगाने जागतिक अस्थमा दिनानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. डॉ. चौधरी यांनी सांगितले, की दमा ही व्याधी मुख्यत्वे श्वसन यंत्रणेशी संबंधित आहे. यामध्ये श्वसन नलिकेच्या मार्गात कफाद्वारे अवरोध निर्माण झाल्याने श्वसनमार्ग आकुंचन पावून त्यावर सूज येते. यामुळे रूग्णास श्वासाचा त्रास होतो. दम्याचा त्रास हा आनुवंशिक देखील असू शकतो. शिवाय वातावरणातील बदल, धुळ व धूर, प्रदूषणयुक्त हवा, जुना कफ, धूम्रपान यामुळेही अस्थमा होत असतो.
दोन वर्षांत चित्र बदलले
जगात सरासरी ३ कोटी जनता ही अस्थमा अर्थात दम्याने ग्रस्त आहे. यापैकी जवळपास तीन टक्के म्हणजेच सरासरी ३० ते ३५ लाख लोक ही भारतातील आहेत. मुख्यतः जळगाव शहरातील विचार केल्यास अस्थमाच्या दहा रूग्णांमागे दोन-तीन रूग्णांना धुळीमुळे अस्थमाचा त्रास होता. परंतु, खराब रस्त्यांमुळे उडत असलेल्या धुळीने हे प्रमाण वाढून ३ ते ५ रूग्णांना धुळीमुळे अस्थमाचा त्रास झाल्याचे पहायला मिळत आहे. परंतु चांगली गोष्ट म्हणजे कोरोना काळात वापरला जात असलेल्या मास्कमुळे हे प्रमाण राहिले; अन्यथा रूग्ण संख्या आणखी वाढल्याची शक्यता डॉ. चौधरी यांनी वर्तविली.
Web Title: Jalgaon Dust Using Masks Asthma Patients Growth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..