
जळगाव : कापसाला यंदा नऊ हजारांवर दराचे संकेत
जळगाव : जिल्ह्यात २०२१ मध्ये अतिवृष्टीने कपाशीचा हंगाम हातचा गेला. जी कपाशी हातात आली तिला नऊ ते अकरा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कापसाचे उत्पन्न अत्यल्प आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भाव चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामात वीस टक्के अधिक पेरा करण्याचे नियोजन केले आहे. तर कापसाला या हंगामात नऊ हजारांवर दर मिळणार असल्याचे संकेत आहेत.
कपाशीची मोठी लागवड होऊनही अतिवृष्टीने अत्यल्प उत्पन्न आले. याचा फटका जिनिंग प्रेसिंग मिल चालकांना बसला. नऊ ते अकरा हजांराचा दर देऊनही कापूस मिळाला नाही. यामुळे ९५ टक्के जिनिंग मार्च महिन्यातच बंद कराव्या लागल्या. कपाशीचे उत्पन्नही ८ लाख गाठींचेच झाले. जे बारा ते पंधरा लाख गाठी निर्माण करण्याचे होते. आगामी हंगामात जिनिंग चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी शेतकऱ्यांकडून कपाशीचा चांगला पुरवठा झाला पाहिजे. यामुळे जिनिंगचालकांकडून विविध प्रकारची मदत जिनिंगचालक कापूस उत्पादकांना करीत असल्याचे चित्र आहे.
कापूस शिल्लक नाही
सध्या बाजारात कापसाला अकरा ते बारा हजारांचा दर मिळत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांकडे कापूसच शिल्लक नाही. परिणामी, जिनिंग बंद झालेल्या आहेत. पंधरा लाख गाठी निमिर्तीतून चार हजार पाचशे कोटींची उलाढाल होत असे. यंदा आठ लाख गाठीतून केवळ २८०० कोटींची उलाढाल होईल. दोन हजार ते एकविसचे कोटींचा तोटा या उद्योगाला कापसाअभावी सहन करावा लागला आहे.
वर्ष पेरणी क्षेत्र. उत्पादन वाढ/घट
२०२१-२२ ५ लाख ३७ हजार ३३७ १ लाख ९ हजार ७९ (५१ टक्के घट)
२०२२-२३ ५ लाख ५० हजार २ लाख ७५ हजार (२० टक्के वाढ अपेक्षित)
कापूस गाठींची निमिर्ती यंदा पंधरा लाख गाठींपेक्षा अधिक होणार, असे चित्र चांगल्या पावसामुळे सुरवातीस होते. अतिवृष्टीने कापूस उत्पादन कमी झाले. कापसाची बाजारातील आवक बंद झाल्याने यंदा लवकर जिनिंग मिल्स बंद कराव्या लागतील. येत्या खरीप हंगामात नऊ हजारांवर दर असतील, अशी शक्यता आहे.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल्स ओनर्स असोसिएशन