esakal | Jalgaon | बनावट कागदपत्रांद्वारे बंडखोरांचा गटनेतेपदावर दावा
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव महापालिका

जळगाव : बनावट कागदपत्रांद्वारे बंडखोरांचा गटनेतेपदावर दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजप महापालिकेच्या गटनेतेपदी भगत बालाणीच असल्याची विभागीय आयुक्तांकडे नोंद आहे. मात्र बंडखोर गटाने खोटी कागदपत्रे देऊन पक्षाच्या ॲड. दिलीप पोकळे यांचा गटनेतेपदाचा दावा केला असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते डॉ. राध्येश्‍याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. जळगाव महापालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक होते, अडीच वर्षांनी महापौर निवडणुकीच्या वेळी तब्बल २९ नगरसेवकांनी बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपने बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली, त्यावेळी बंडखोर गटाने आपणच भाजपचे अधिकृत असून आमचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे असल्याचा दावा केला होता.

विभागीय आयुक्तांनी त्याच दाव्याच्या आधारे बंडखोर असलेले ॲड. पोकळे यांना भाजपचे गटनेते मान्य करून त्यांच्या दावाच्या आधारे भारतीय जनता पक्षात असलेल्या २७ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. बालाणीच गटनेते, पोकळे नव्हे अरविंद देशमुख यांनी विभागीय आयुक्तांकडे माहिती अधिकारांत पत्र देऊन जळगाव महापालिकेतील भाजपचे सध्याचे गटनेते कोण? याची माहिती मागविली होती. याबाबत माहिती देताना डॉ. चौधरी यांनी सांगितले, विभागीय आयुक्तांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत भाजपचे सध्याचे गटनेते भगत बालाणी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भाजपचे गटनेते पोकळे नसल्याचे सिध्द झाले आाहे.

हेही वाचा: किरकोळ महागाईत घट; केंद्राला मोठा दिलासा

पोकळेंकडून फसवणूक

बंडखोर ॲड. दिलीप पोकळे यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप डॉ. राध्येश्‍याम चौधरी यांनी केला आहे. ॲड. पोकळे यांनी संपूर्ण बनावट कागदपत्रे सादर करून आपण भाजपचे गटनेते असल्याचा दावा केला आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर विभागीय आयुक्तांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची बुधवारी (ता. १३) रोजी निवड आहे, त्या पार्श्वभूमीवर सदस्य निवडीबाबत कोणताही अहिताचा निर्णय घेऊ नये यासाठी महापालिकेत भाजपचे गटनेते भगत बालाणीच असल्याचे विभागीय आयुक्तांचे पत्र आम्ही महापालिका आयुक्तांना दिले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप गटनेते भगत बालाणी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगेपाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, अरविंद देशमुख उपस्थित होते.

आम्ही सर्व २९ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र विभागीय आयुक्तांकडे दिले आहे, त्याच आधारे त्यांनी आमच्या गटनेतेपदाला मान्यता दिली आहे. यात फसवणुकीचा मुद्दा येतच नाही. त्यांनी गटनोंदणीच्या वेळी गटनेतेपदी बालाणी असल्याची नोंद केली तीच माहिती आहे. त्यामुळे आजही आमचा गटनेतेपदाचा दावा कायम आहे. याबाबत जो काही निकाल असेल तो विभागीय आयुक्तांकडे सुरू असलेल्या न्यायप्रविष्ट सुनावणीत होईल.

- ॲड. दिलीप पोकळे

loading image
go to top