
जळगाव : कजगाव रस्त्याचे काम 'निकृष्ट'
पारोळा : शहरातील महामार्ग क्रमांक सहापासून कजगावकडे जाणाऱ्या कजगाव नाका ते राजेश पाटील यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजुर झाला असून या रस्त्याचे काम सुमारे चार महिन्यांपासून सुरु आहे. हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करु, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी दिला आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कजगाव रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार मंजूर इस्टीमेट प्रमाणे करीत नसून जे काही काम आजपर्यंत झालेले आहे ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. राजेश पाटील यांच्या घरापासून ते डॉ. हर्षल माने यांच्या दवाखान्यापर्यंत तसेच डॉ. सुरेश पाटील यांच्या दवाखान्यापासून ते शीतल हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंट काँक्रिट उघडून वर आले आहे. ज्यामुळे रस्त्यावर लहान लहान खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असल्याने रस्त्यावरील धुळीचा आजूबाजूच्या दुकानदारांसह रहिवाशांना त्रास होत असतो. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ॲड. तुषार पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काल मध्यरात्री सिमेंट रस्त्यावर डांबराची बारीक फवारणी करुन त्यावर कचखडी टाकली. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे डांबर वितळत असल्याने त्याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता मंजूर इस्टीमेट प्रमाणे पूर्णपणे सिमेंट काँक्रिटचा असताना संबंधित ठेकेदाराकडून मात्र, त्याचे डांबरीकरण केले जात आहे.
पारोळा- कजगाव रस्त्यालगत असणाऱ्या कॉलन्यांकडे जाणारे रस्ते या मुख्य रस्त्याला जोडलेले नाहीत. आमदारांच्या मालकीच्या पेट्रोलपंपासाठी मात्र सोयीच्या दृष्टीने हा रस्ता जोडण्यात आला आहे. त्यामुळे हे काम निविदेनुसार होत नसल्याचा नसल्याने आठ दिवसात या मंजुर रस्त्याची गुणवत्ता नियंत्रकांमार्फत चौकशी करावी, तोपर्यंत ठेकेदाराला हे काम करु देऊ नये.
तसेच संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने नव्याने करावे. या संदर्भात दखल न घेतल्यास, जनआंदोलन करुन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. अतुल मोरे, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र पाटील, जितेंद्र चौधरी, सविन गुजराथी, नरेंद्र साळी, समीर वैद्य, संकेत दाणेज, नरेंद्र राजपूत, गणेश बालुसा, बापू महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Jalgaon Kajgaon Bad Road Construction Work Bjp Office Bearers Inquiry Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..