
जळगाव, - जिल्हा कारागृहाला लागून असलेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीच्या गच्चीवरुन साहित्य फेकून आतील कैद्यांना हवे ते, उपलब्ध करून दिले जाते. भिंतीवरून पार्सल फेकणाऱ्या एका गुन्हेगाराला तुरुंगाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडला आहे. त्याचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यास यशस्वी ठरले. जिल्हापेठ पेालिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारागृहातून तीन कैदी पळून जाण्याच्या घटनेला चार दिवस उलटत नाही तोवर, आज असा प्रकार समोर आल्याने कारागृह प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्हा कारागृहात बंदीवान असलेल्या कैद्यांना चिलम, गांजा, सिगारेट, तंबाखू सहीत मोबाईल असे साहित्य पुरवले जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून आतील तीन कैदी पसार झाल्याची घटना शनिवारी(ता.२५)घडली. राज्यभर या घटनेमुळे पेालीस दल व तुरुंग प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे धिंडवडे निघत असताना आज पुन्हा कारागृहातील कैद्यांना भिंतीवरून पार्सल फेकून साहित्य पुरवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कर्मचारी निवासस्थानाच्या गच्चीवर चढून तेथून कारागृहात बिस्किटाचे पुडे, तंबाखू व इतर साहित्य पाडले जात असल्याचे सर्कलवर नियुक्त कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरड करून गेटवर कळवल्यानंतर तुरुंग अधिकारी किरण पवार, कुलदीप दराडे, विक्रम हिवरकर,शांताराम घण अशांनी पाठलाग करून एकाला पकडले. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. सोनू दिनेश राठोड (वय-२१,रा.सुप्रीम कॅालनी) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून जिल्हापेठ पोलिसांत त्याच्यासह इतर देान साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्होरक्या आत, टोळी बाहेर..
शहरासह परिसरात वाहनचोऱ्या, घरफोड्यांच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या दिनकर रोहीदास चव्हाण हा कारागृहात आहे. त्याचे साथीदार टोळीतील सेानू रमेश राठोड, अविनाश शिंदे, साई आठे असे तिघेही जामिनावर असून कारागृहातून 'बॉस'निरोप आल्यावर हवे ते, साहित्य तिघांकडून पुरवले जाते. कर्मचारी निवासस्थानाच्या गच्चीवर चढून जेल मध्ये ठरावीक ठिकाणी हे पार्सल फेकल्यावर संबंधितापर्यंत पेाहचते.
संपादन - रईस शेख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.