Latest Marathi News | 'अमृत’चे काम झाले नाही, तरी रस्त्यांची कामे होणार : महापौर जयश्री महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon mayor

'अमृत’चे काम झाले नाही, तरी रस्त्यांची कामे होणार : महापौर जयश्री महाजन

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या कामाकडे आपले लक्ष आहे, मात्र ‘अमृत’च्या कामामुळे अडचणी निर्माण होत आहे. मात्र आता ते काम झाले नाही, तरी कोणत्याही रस्त्याचे काम थांबणार नाही. प्राधान्याने रस्त्याची कामे करण्यात येतील, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे. रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही दिरंगाई आता सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.(jalgaon Mayor Jayashree Mahajan statement about road construction jalgaon latest news)

महापालिकेत शुक्रवारी (ता. १६) शहरातील महामार्गावरील रस्त्याच्या कामाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ‘न्हाई‘चे अधिकारी चंद्रकांत सिंन्हा तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीची माहिती देताना महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की कालिका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंत महामार्गाच्या कामाबाबत खासदार उन्मेश पाटील यांच्या समवेत आपणही पाहणी केली होती. या महामार्गावर काही तृटी आहेत तसेच अंडरपास खाली पाणीही साचत आहे. त्याबाबत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी संयुक्तरित्या पाहणी करून त्याची कामे तातडीने सुरू करणार आहेत.

रस्त्यांची कामे आता प्राधान्याने

शहरातील रस्त्याच्या कामाबाबत विचारले असता, महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की ‘अमृत’च्या कामामुळे शहरातील रस्त्याची कामे थांबली होती. मात्र आता ‘अमृत’चे काम होवो अथवा न होवो त्या भागातील रस्त्यांची कामे होणारच आहे. जर त्या भागातील नळ कनेक्शन तसेच इतर कामे बाकी असतील तर त्याला संबंधित लोक जबाबदार असतील.

भाजपने टिका करू नये

शहरातील रस्त्याच्या कामाबाबत भाजपच्या नगरसेविकांनी टीका केली आहे, त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता आहे, त्यांनी शहरातील कामाबाबत टीका न करता, सोबत यावे. रस्ताच्या कामाबाबत काही तांत्रिक तृटी असतील त्या आपण दूर करून शहरासाठी एकजुटीने कामे करू या असे आवाहनही त्यांनी केले.

आमदारांनी महापालिकेवर विश्‍वास ठेवावा

शहरातील रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याबाबतही त्यांनी टीका केली, त्या म्हणाल्या, की शहरातील रस्त्यांची कामे महापालिकेमार्फतच होण्याची गरज आहे, ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देवू नये अशी आमची मागणी होती. परंतु तरीही आमदार सुरेश भोळे यांनी ती कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली.

त्या विभागाने केलेल्या दिरंगाईमुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आरोप त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, की आमदार महापालिकेवर मोठे झाले आहेत. परंतु त्याच महापालिकेच्या कामावर त्यांचा भरवसा नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. यापुढे आम्ही शासकीय निधीची कामे महापालिकेमार्फतच करणार आहोत असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.