जळगाव : मनपा आयुक्तांचा कामाच्या जागेवर तपासणीचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad

जळगाव : मनपा आयुक्तांचा कामाच्या जागेवर तपासणीचा दणका

जळगाव : मक्तेदाराला रस्त्याचे, तसेच इतर काम दिल्यानंतर ते काम कसे झाले आहे, याची वरवर पाहणी करून बिले अदा केली जात होती. मात्र, आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता. २५) स्वत: काम झालेल्या रस्त्यावर जाऊन ‘टेस्टिंग हॅमर’ या उपकरणाद्वारे कामांची तपासणी केली. रस्त्यावर सीलकोट व्यवस्थित नसल्याने दोन मक्तेदारांना नवीन काम करण्याचे आदेश दिले. जळगाव महापालिकेत अशाप्रकारे मक्तेदारांच्या कामाची तपासणी प्रथमच झाली आहे.

महापालिकेतर्फे मक्तेदारास काम दिल्यानंतर त्याच्या कामाची तपासणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत होती. सिमेंट काम केलेल्य जागी थोडेसे उकरून त्याची तपासणी करून त्यावरच कामाचा अहवाल करून संबंधित मक्तेदाराची बिले अदा करण्यात येत होती. त्यामुळे मक्तेदारांची अनेक निकृष्ट दर्जाची कामे दिसून येत नव्हती, तसेच बिल अदा झाल्यानंतर मक्तेदारही त्याची दखल घेत नव्हता. त्यामुळे पैसे जाऊनही निकृष्ट काम होत होते व त्याचा त्रास जनतेला होत होता.

हेही वाचा: महापालिकेच्या 17 मजलीत पाणी टंचाई; कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी अत्याधुनिक पद्धतीने कामाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंट कॉंक्रिटच्या रस्ता, खोली, तसेच सरंक्षक भिंतींच्या कामांची तपासणी ‘टेस्टिंग हॅमर’ या उपकरणाद्वारे करण्यात येत आहे. या मशिनद्वारे कामाच्या गुणवत्तेची अचूक तपासणी होते. महापालिकेने प्रथमच हे उपकरण खरेदी केले आहे. मक्तेदाराने महापालिका प्रशासनाकडे सादर केलेल्या देयकाप्रमाणे कामाची गुणवत्ता प्रशासनास तपासता येते. त्यामुळे मक्तेदारांवर वचक राहणार आहे.

कामांची जागेवर पाहणी

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी स्वत: बुधवारी शहरातील नवीन सिमेंट कॉंक्रिट केलेल्या रस्त्यांची व फेन्सिंग कामाची या मशिनद्वारे तपासणी केली. पिंप्र।ळा येथील आनंद मंगल सोसायटी, हुडको दर्गा ते खंडेरावनगर रस्ता, पिंप्राळा तलाठी कार्यालय ते रेल्वे पुलापर्यंतचे रस्ते व गटारींच्या काँक्रिटची टेस्टिंग हॅमर मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच नेहरूनगरमधील पेव्हर ब्लॉकचे कामाच्या काँक्रिटची तपासणी करण्यात आली. टेलिफोननगरमधील चैनलिंक फेन्सिंगच्या कामाची तपासणी करण्यात आली. या वेळी त्यांच्यासमवेत शहर अभियंता विलास सोनवणी, शाखा अभियंता मनोज वनेरे, नरेंद्र जावळे, संबंधित मक्तेदार, प्रतिनिधी उपस्थित होते. मक्तेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केलेल्या देयकाची पाहणी केली.

हेही वाचा: Jalgaon : महापालिकेचे पगार अडकले ‘सॉफ्टवेअर’च्या मक्त्यात

नवीन सीलकोट करण्याचे आदेश

पाहणीत दोन रस्त्यांचे सीलकोट मक्तेदाराने दिलेल्या प्रमाणात केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांनी त्या रस्त्याच्या कामाचे बिले थांबविण्याचे आदेश देऊन संबंधित मक्तेदारास रस्त्यावर नव्याने सीलकोट करून द्यावे, असे आदेश दिले.

Web Title: Jalgaon Municipal Commissioner Inspects Workplaces

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top