
महिलेच्या पोटातून काढला पंधरा किलोचा गोळा
जळगाव : गडखांब (ता. अमळनेर) येथील ४० वर्षीय महिलेला पोटात अनेक दिवसांपासून दुखत होते, म्हणून ती ‘जीएमसी’त आली. महिलेची तपासणी झाली. त्यात तिच्या पोटात मांसाचा गोळा वाढत असलेला डॉक्टरांना दिसून आला. तातडीने शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील तब्बल १५ किलोचा गोळा बाहेर काढण्यात आला.
एवढा मोठा गोळा काढण्याची अवघड शस्त्रक्रिया उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी ‘सकाळ’ला दिली. कमलबाई रमेश भिल या महिलेच्या पोटात वेदना असह्य होत होत्या. नातेवाइकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे उपचारासाठी दाखल केले. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला दिसून आला. सर्व तपासणीअंती हा अंडाशयाचा गोळा असल्याचे निदान झाले. यामुळे तिच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला होता.
वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुख डॉ. बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केली असता, तिच्या पोटातून १५ किलोचा गोळा निघाला. जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून, गर्भाशयदेखील काढण्यात आले. यामुळे महिलेचा जीव वाचला. यशस्वी उपचार करण्याऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले. डॉ. बनसोडे, डॉ. अनिता ध्रुवे, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. शीतल ताटे, डॉ. राजश्री येसगे यांनी शस्त्रक्रिया केली. बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्निल इंकणे, इन्चार्ज सिस्टर नीला जोशी, सोनाली पाटील, सीमा राठोड यांच्यासह विजय बागूल, कुणाल कंडारे, कृष्णा पाटील, रवींद्र पवार, किशोर चांगरे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Web Title: Jalgaon Woman Stomach Fifteen Kilos Removed Surgery At Gmc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..