
अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा ; 'विकतचे' पाणी पिण्याची वेळ
जळगाव : मागील काही दिवसांपासून जळगाव शहरातील द्वारकानगर परिसरात अशुद्ध व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. भांड्यांमध्ये पाणी भरल्यानंतर ते हिरवे, पिवळे दिसून येत आहे. त्यामुळे, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहेत.
जळगाव शहरातील वाढीव वस्ती असलेल्या निमखेडी शिवारातील द्वारकानगर परिसरात मुळात सुविधांचा अभाव आहे. रस्ते, गटारी अद्याप झालेल्या नाहीत. पाणीपुरवठ्याची पाइपलाइनचे काम झाले आहे. यात देखील मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. भर उन्हाळ्यात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील द्वारकानगर, मनुदेवी सोसायटी या भागात अशुद्ध व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. प्रामुख्याने लहान मुलांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवत आहे. तसेच मोठ्यांना देखील पोटाचे विकार सुरू झाले आहेत.अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. ही समस्या मागील तीन ते चार वेळा निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेकडून दिले जात असलेले पाणी हे रोजच्या वापरासाठी वापरण्यात येत आहे. परिसरातील नागरिक पिण्यासाठीचे पाणी विकत आणत आहेत.
मागील तीन ते चार वेळा दूषित पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग नाही. उन्हाळ्यात असे पाणी मिळत असेल तर पावसाळ्यात कसे होणार, हा प्रश्न आहे. पाणी चांगले नसल्याने जारचे पाणी विकत आणावे लागत आहे.
- यमुनाबाई सोनवणे, द्वारकानगर
पिवळ्या पाण्याची समस्या आजाराला आमंत्रण देणारी आहे. शिवाय मुख्य रस्त्यावर असलेल्या पाइपलाइनला लिकेज आहे. ते लिकेज दुरूस्त केले. तरी देखील लिकेज कायम आहे. यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असावा.
- राधाबाई पाटील, द्वारकारनगर
Web Title: Jalgoan Citizen Buy Water Unclean Muddy Water Supply
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..