
जळगाव : वीटभट्ट्यांच्या धुरामुळे कोंडला श्वास
वरणगाव : सध्या शहरासह परिसरात किमान एक हजारापेक्षा जास्त वीटभट्ट्या सुरू आहेत. प्रदूषण नियंत्रक विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र कोणीच घेतलेले नसतानाही वीटभट्टीसाठी दगडी कोळसा जाळत असल्यामुळे सर्वत्र धुरातून विषारी वायू पसरून प्रदूषणात वाढ झाली असून, नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वरणगावसह परिसरात एक हजारापेक्षा जास्त व्यावसायिकांनी अनधिकृत वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. भुसावळ तहसील कार्यालयाकडून कोणत्याच वीटभट्टीधारकाला परवानगी दिली नसताना बिनदिक्कत हे व्यवसाय सुरू आहेत. या भट्टांमध्ये दगडी कोळशाचे इंधन म्हणून उपयोग करण्यात येत आहे.
प्रदूषण नियंत्रक मंडळानुसार, इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायूमधील सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील डायऑक्साईडमुळे फुफ्फुस व त्वचेचे आजार होतात. कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या विषारी वायूमुळे वीटभट्ट्यांच्या परिसरातील तापमानात वाढ होऊन सभोवतालच्या शेती व नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत.
या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केले आहेत. परिणामी, वीटभट्टीचालक प्रदूषण नियंत्रक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता भट्ट्या सुरू केल्याचे समोर आले आहे. विटभट्ट्यांविषयी भुसावळ तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय तहसील कार्यालयाकडून वीटभट्टीला अधिकृत परवानगी देण्यात येत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
समस्येकडे डोळेझाक
बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे हे स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र, ‘तहसील’चे अधिकारी या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्यामुळे बिनबोभाटपणे सर्वत्र बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरू झाल्या असून, याच्या धुरामुळे विषारी वायू पसरून प्रदूषणात वाढ झाली आहे. या समस्येकडे तहसील व प्रदूषण महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Web Title: Jalgoan Pollution Increased Brick Kiln Burning Coal Toxic Gases
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..