
राज ठाकरे ‘एजंट’ चे काम करतात
जळगाव : सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद आहे, मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही, ते केवळ ‘एजंट’ म्हणून काम करतात असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज लगावला. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते, राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे. मात्र त्यांना यश मिळत नाही. अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे. अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते. त्यांच्याकडे एकही पालिका नाही, त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्या मुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाऊंट कोरेच आहे, बीना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही, जनतेने त्यांना यश दिले पाहिजे.
राज ठाकरे हे कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतात, ते आता कोणाचे एजंट आहेत सर्व जनतेला माहीत आहे. दर पाच वर्षांनी त्यांची भूमिका बदलत असते. पहिली भूमिका काय?, पक्ष स्थापनेची भूमिका काय?, झेंड्याची भूमिका काय?, आता तर झेंड्यात इंजिन घुसले आहे. स्वतःच्या पक्षाची भूमिका बदलवितो त्या माणसाला यश मिळत नाही. ते मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे.