Jalgaon Crime News : वाळू व्यावसायिकांकडून कोतवालास मारहाण; 3 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

Jalgaon Crime News : वाळू व्यावसायिकांकडून कोतवालास मारहाण; 3 जण जखमी

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील अंजाळे येथील कोतवाल ओंकार लिलाधर सपकाळे हे प्रशासनास अवैध वाळू वाहतुकीविषयी माहिती देत असल्याच्या संशयावरून गावातील पाच संशयित अवैध वाळू व्यावसायिकांनी तलाठी कार्यालयात जात कोतवाल ओंकार सपकाळे यांना बेदम मारहाण केली.

भांडण सोडविण्यास गेलेल्या वडिलांसह त्यांच्या भावासही मारहाण केल्याने या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा झाला आहे. (Kotwal assaulted by sand businessmen 3 people injured Jalgaon Crime News)

प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील अंजाळे घाटात महसूल, विभागाने बैठे पथक नियुक्त केले असून, या पथकात अंजाळे येथील कोतवाल ओंकार सपकाळे (वय ३२) यांची नियुक्ती केलेली आहे.

दरम्यान, शनिवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास सपकाळे यांना अंजाळे येथील धनराज सपकाळे हे तापी नदीतून वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सपकाळे व तलाठी शरद सूर्यवंशी यांनी नदीपात्राजवळ जाऊन पाहिले. मात्र त्या ठिकाणी कोणतेही ट्रॅक्टर आढळून आले नाही.

त्यानंतर तलाठी सूर्यवंशी व कोतवाल हे तलाठी कार्यालयात कार्यालयीन कामकाज करीत असताना दुपारी अडीचच्या सुमारास गावातील धनराज सपकाळे, सागर कोळी, देवानंद शंकोपाळ, तोताराम सपकाळे, देवेश सपकाळे यांनी तलाठी कार्यालयात घुसून कोतवाल सपकाळे यांना तुला माझेच ट्रॅक्टर दिसते का रे?

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

असा प्रश्न करत कोतवाल सपकाळे यांना चापटा-बुक्क्या व लाथांनी तोंडावर, डोक्यावर, मारहाण केली. तलाठी सूर्यवंशी यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणाचेही काही ऐकले नाही. घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थांसह सपकाळे यांचे वडील लीलाधर नामदेव सपकाळे (वय ६२) व भाऊ जितेंद्र सपकाळे तेथे आले असता व ते भांडण सोडविण्यास गेले असता वडील व भावासही त्यांनी बेदम मारहाण केली आहे.

या घटनेची कोतवाल सपकाळे यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पाचही संशयताविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार प्रदिप बोरुडे तपास करीत आहेत.

तलाठी, कोतवाल संघटनेतर्फे निषेध

या घटनेचा तलाठी व कोतवाल संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला असून, येथील पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांना दिलेल्या निवेदनात कडक कारवाईची मागणी केली आहे.