जळगावमध्ये महाविकास आघाडी बळकट; भाजपसमोर मोठे आव्हान

जिल्हा बँक निवडणूक; आगामी निवडणुकांमध्येही आघाडी राहिल्यास फायदा
Jalgaon District Bank Election
Jalgaon District Bank Electionsakal

जळगाव : राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेचा संसार सुरू आहे, त्याच मार्गावर सहकार क्षेत्रातील जळगाव जिल्हा बँकेतही महाविकास आघाडीने सत्ता मिळविली आहे. फरक एवढाच या ठिकाणी भाजप विरोधात नसली तरी बाहेरून विरोध करुन दबावगट निर्माण करणार असल्याची घोषणा नेत्यांनी केली आहे. या सत्तेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि अत्यंत कमकुवत असलेल्या कॉंग्रेसला बळ मिळाले आहे. भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याने त्यांचे मोजमाप होत नाही, मात्र त्यांचा हा कमकुवतपणा ठरला असल्याचे मत व्यक्त होत असले तरी ते आगामी काळात दिसून येईल. पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत या यशाचे महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती फायदा घेतात, आणि विरोधी असलेला भारतीय जनता पक्ष त्यांना काटशह देऊन यश कसे मिळविणार हे दिसून येणार आहे.

‘सहकार‘हे राजकारणापासून अलिप्त आहे, असे म्हटले जाते. मात्र राजकारणाशिवाय सहकार नाही हे चित्र राज्यातील जिल्हा बँक निवडणुकीवरून दिसून आले आहे, त्यामुळे त्याला जळगाव जिल्हाही अपवाद निश्‍चित नाही. राज्यात ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाची जळगाव जिल्हा बँकेवर सत्ता असे चित्र आजपर्यंत दिसून आले आहे. गेल्या वेळी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, त्यावेळी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी नेतृत्व करून सर्वपक्षीय यश मिळविले होते, मात्र त्यात भाजपचे संचालक अधिक होते, त्यामुळे भाजपचा अध्यक्ष होता, पर्यायाने भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना क्रमांक दोनवर होती. आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांनी नेतृत्व करीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन केली. याठिकाणी खडसे यांनी आपल्या नेतृत्वाचे कौशल्य दाखवीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक जागा जिंकून दिल्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या ठिकाणी सर्व पक्षीय आघाडीचा प्रयत्न झाला. मात्र त्याला व्यवस्थित ‘शह’देण्यात आला, त्यात राजकीय डावपेच कसे पडले हे राजकीय क्षेत्रातील सर्वानाच माहित आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. जर हा संघर्ष जिल्हा बँकेत झाला असता, त्यात जय, पराजय झाला असता, तर त्याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीत उमटले असते. त्यामुळे भाजपने‘बहिष्कार‘ करण्याचा मुलामा देऊन निवडणुकीतून माघार घेतली. मात्र यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला या निवडणुकीतून यशाला बळ तर मिळालेच परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक ताकदवर झाली.

जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी असेल की नाही हे मात्र सद्या सांगणे कठीण आहे, परंतु गेल्या तीस वर्षापासून जिल्हा परिषदेवर असलेली भाजपची सत्ता घालविण्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या तर यश मिळेल हे तिन्ही पक्षातील नेते आता जाणून आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी जिल्हा बँकेतील यश हे ‘मॉडेल‘ठरल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय जनता पक्षाला मात्र आता हे मोठे आव्हान असणार आहे, हे मात्र निश्‍चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com