सात वर्षाची शिक्षा भोगून दोन महिन्यापुर्वीच आला घरी; पुन्हा केले बलात्‍काराचे कृत्‍य, पोलिसांनी धावत्‍या रेल्‍वेतून घेतले ताब्‍यात

दीपक कच्छवा
Monday, 4 January 2021


अल्‍पवयीन मुलीला हेरून तिला खाऊचे आमिष देत अत्‍याचार केला. सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आणि सात वर्ष जेलची हवा खाल्‍ली. सात वर्षाची शिक्षा भोगून आल्‍यानंतर देखील सुधारला नाही; आणि अवघ्‍या दोन महिन्यानंतर अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करून फरार होण्याचा मार्गावर होता.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर 36 वर्षीय नराधमाने आत्याचार केल्याची घटना शिरसगाव (ता.चाळीसगाव) येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी या नराधमाच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच मेहूणबारे पोलीसांनी शिताफीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासात चालु हावडा मेलमधुन पुण्याकडे पळून जाण्याच्या बेतास असलेल्या आरोपीला मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.

शिरसगाव (ता.चाळीसगाव) येथे पाच वर्षीय चिमुकली रात्री आठ वाजेच्या सुमारास घराशेजारीच मुलींमध्ये खेळण्यासाठी गेली होती. यावेळी संशयित आरोपी संदीप सुदाम तिरमली याने बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून तिच्यावर अमानुष अत्याचार केला. सदर बालीका रडत- रडत घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. 

आई- वडीलांची पोलीसात धाव
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप यास याबाबत हटकले असता तो तेथून पळून गेला. सदरील पीडित बालिकेच्या आई- वडिलांनी मेहूणबारे पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी संदीप सुदाम तिरमली याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार या कायद्यान्वये मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी एक तासात गाठले मनमाड 
बालिकेवर अत्याचार करणारा संदीप तिरमली हा नराधाम घटनास्थळावरून फरार झाला. तो हावडा मेलले मनमाडमार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मेहूणबारे पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे, एएसआय गोपाल पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पोकॉ गोरख चकोर, शैलेश माळी, कमलेश राजपूत यांचे पथक रात्री साडेबारा वाजता मेहुणबारे येथून मनमाडकडे खाजगी गाडीने रवाना झाले. पोलिसांनी प्रवासा दरम्यान संशयीताचे वर्णन व फोटोच्या आधारे मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन येथील पोलीस मित्र तसेच आरपीएफ यांना माहिती अवगत केल्यानंतर आरपीएफ पोलीसांनी चालत्या हावडा मेलमधून मनमाडच्या स्थानकावर बोगीत बसलेल्या संदीपच्या मुसक्या आवळल्या. 

मैत्रीणीकडे जाण्यासाठी पुण्याला रवाना
संदीप हा पुणे येथे आपल्या मैत्रिणीकडे पळून जाण्याच्या बेतात होता. मेहूणबारे पोलीसांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात तपासाचे चक्र जलदगतीने हलवून मनमाड रेल्वे स्थानकावरून संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस पथकातील गोपाल पाटील, योगेश मांडोळे, गोरख चकोर, शैलेश माळी यांचे कौतुक केले जात आहे. सदरील आरोपी हा पुण्याकडे त्याची मैत्रीण असल्याने तो तिच्याकडे जाणार होता. तो मनमाड स्थानकावरुन पळुन गेला असता तर लवकर सापडला नसता; मात्र मेहुणबारे पोलिसांनी चक्क दोन तासात त्यांला पकडले.

अत्याचार प्रकरणी यापुर्वी सात वर्षाची शिक्षा
आरोपी संदीप सुदाम तिरमली याने 2012 मध्ये देखील अशाच प्रकारे लग्नासाठी आलेल्या पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन त्याला न्यायालयाने सात वर्ष शिक्षा ठोठावली होती. दोन महिन्यापूर्वी तो शिक्षा भोगून बाहेर आला होर्तों. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असतांना तो काही दिवस पॅरोलवर बाहेर आला होता. त्यावेळी पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो कारागृहात न जाता फरार झाला होता. पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्याची कारागृहात रवानगी केली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याने दोन महिन्यात पुन्हा चिमुरडीवर अत्याचार केला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत.

सदर घटनेप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. संशयित आरोपीला जास्तीत जास्त वाढीव कलमे लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विषेश म्हणजे आमच्या पथकाने या आरोपीला चालत्या हावडा एक्स्प्रेसमधुन ताब्यात घेतले.
– पवन देसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक मेहुणबारे (ता.चाळीसगाव)

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jaldaon news chalisgaon crime news girl torcher again sevan year jail