
लाल मार्करने भिंतीवर सुसाईड नोट लिहून ठेवली. चौथी शिकलेला असल्याने तोडक्या मोडक्या भाषेत त्याने लिहले आहे. श्री गणेशाय नमः असे लिहून त्याने सुरुवात केली.
जळगाव : पती– पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली. तिला घेण्यासाठी सुरतहून गावी आला. जाण्यापूर्वीच त्याचा पत्नीशी फोनवर वाद झाला. मनात काय आले म्हणून त्याने टोकाचे पाऊल उचलले. चौथीपर्यंत शिक्षण झाल्याने चांगले लिहिता येणे देखील जमत नव्हते. तरी देखील सुसाईड नोट जसे जमेल तशा स्वरूपात भिंतीवर उतरविल अन् जगाचा निरोप घेतला.
असोदा येथील रामचंद्र उर्फ भुरा देवराम महाजन (वय 28) या तरुणाचे नाव आहे. पत्नीशी वाद असल्याने यातून त्याने राहत्या घरी दुपारी गळफास घेवून आत्महत्या केली.
पत्नीला आणण्याबाबत भावाशी चर्चा
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र माळी हा सुरत येथे एका कंपनीत चालक म्हणून कामाला होता. सुरत येथेच तो पत्नी निकिता व मुलगी रक्षा यांच्यासह वास्तव्यास होता. कौटुंबिक वादातून मागील काही दिवसांपूर्वी पत्नी निकिता माहेरी खामगाव (जि.बुलढाणा) येथे मुलीला घेवून गेली होती. पत्नीला घेण्यासाठी रामचंद्र शनिवारी सकाळी सुरतहून आसोदा येथे आला. यानंतर त्याने त्याचा मोठा भाऊ रामकृष्ण याच्याशी याबाबत चर्चा केली. त्यावर रामकृष्ण याने रामचंद्र याला तु खामगाव जावू नको, तिला आपण आसोदा येथे बोलावून घेवू, यानंतर काहीतरी मार्ग काढू असे सांगितले. यावेळी रामचंद्र याचा मामेभाऊ सुध्दा होता.
फोनवरही झाला वाद
तिघांची चर्चा सुरु असतांना रामचंद्र तेथून निघून गेला. थोड्या वेळाने रामचंद्रचा भाऊ रामकृष्ण हा नातेवाईकांना सोडण्यास निघून गेला. यानंतर घरी आलेल्या रामचंद्र याने पत्नी निकिताला फोन लावून बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर देखील दोघांमध्ये भांडण झाले. या वादानंतर रामचंद्रने राहत्या घरात दोराने गळफास घेवून आत्महत्या केली.
भिंतीवरील आशय समजेना पण
रामचंद्रने आत्महत्या करण्यापुर्वी लाल मार्करने भिंतीवर सुसाईड नोट लिहून ठेवली. चौथी शिकलेला असल्याने तोडक्या मोडक्या भाषेत त्याने लिहले आहे. श्री गणेशाय नमः असे लिहून त्याने सुरुवात केली. तोडक्या मोडक्या अक्षरातील हे कुणालाही वाचता येत नाही, यात रामचंद्र याने पत्नी, सासू, साडू आणि पत्नीची बहिण यांची नावे लिहीले असून त्यांच्यावर आरोप केले आहेत. काहीतरी कौटुंबिक वादातूनच रामचंद्रने आत्महत्या केली असल्याचे भिंतीवरील आशयावरुन स्पष्ट झाले आहे.
अन् वडीलांना बसला धक्का
रामचंद्र याची आई शेतात, तर वडील गावात गेले होते. वडील घरी आल्यानंतर वरच्या खोली गेले असता रामचंद्रने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. रामचंद्रला पाहून वडीलांनी आक्रोश केला. यानंतर शेजारी धावत आले. रामकृष्णने तातडीने रामचंद्र यास जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयताच्या पश्चात आई कल्पनाबाई, वडील देवराम सुपडू माळी, भाऊ रामकृष्ण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.