अपघातांची मालिका सुरूच; कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्‍यू

राजेश सोनवणे
Sunday, 17 January 2021

महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खोटेनगर ते खेडीपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. याचे काम देखील सुरू आहे. मात्र काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्‍ता खोदण्यात आला आहे. यामुळे चौपदरीकरण देखील अनेकांचे बळी घेत आहे.

जळगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात एका जणाचा जागीच मृत्‍यू झाला तर त्‍याच्या सोबत असलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अपघातांचा मालिका सुरूच आहे.

नाशिक जिल्‍ह्‍यातील गुजरखेडा (ता. येवला) येथील रहिवासी असलेले धवल अंबादास बच्छाव आणि समाधान श्रीराम चंदन हे दोन्ही कामानिमित्त आज दुचाकीने जळगावकडून भुसावळकडे जात होते. शहरातील महामार्गावरील अजिंठा चौफुलीच्या अलिकडे असलेल्‍या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे गेले असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. यात समाधान चंदन हा जागीच ठार झाला. तर धवल अंबादास बच्छाव हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चौपदरीकरणाचे कामही घेतेय बळी
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक अपघात घडत असतात. यात अनेकांना जीव गमवावा लागतो. यामुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खोटेनगर ते खेडीपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. याचे काम देखील सुरू आहे. मात्र काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्‍ता खोदण्यात आला आहे. यामुळे चौपदरीकरण देखील अनेकांचे बळी घेत आहे. गेल्या आठवड्यात देखील याच भागात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आजचा अपघात देखील अरूंद व खराब रस्त्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शचे म्‍हणणे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news accident one death and one injured