esakal | तापीकाठच्या २५ गावांत एकाच वेळी वाजणार सायरन; मिळणार सतर्कतेचा इशारा 

बोलून बातमी शोधा

Sirens will be sounded

पावसाळ्यात अनेकदा तापी आणि पूर्णा या नद्यांना पूर येतो. त्या वेळी या प्रकल्पाचे पाणी (बॅक वॉटर) रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील नदीनाल्यांच्या पात्रात शिरते. यामुळे पिकांचे नुकसान होते आणि जीवितहानी होण्याची भीती असते.

तापीकाठच्या २५ गावांत एकाच वेळी वाजणार सायरन; मिळणार सतर्कतेचा इशारा 
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर (जळगाव) : पावसाळ्यात हतनूर प्रकल्पातील विसर्गामुळे तापी नदीकाठच्या पूरप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणा रावेर, यावल, भुसावल तालुक्यातील २५ गावांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे या सर्व गावांमध्ये सायरनद्वारे एकाच वेळी सतर्कतेचा इशारा देणे शक्‍य होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही यंत्रणा शुक्रवारी (ता. ९) जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली तर रावेर तालुक्यातील तासखेडा येथे शनिवारी (ता. १०) ही यंत्रणा सुरळीत झाली. 
रावेर तालुक्यातील लुमखेडा, उदळी बुद्रुक, तासखेडा, रणगाव, गहूखेडा रायपूर आणि सुदगाव या ७ गावांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तासखेडा येथील किरकोळ दुरुस्तीनंतर आज ही यंत्रणा कार्यान्वित झाली. 

नदीला पूर आल्‍यास धोका
पावसाळ्यात अनेकदा तापी आणि पूर्णा या नद्यांना पूर येतो. त्या वेळी या प्रकल्पाचे पाणी (बॅक वॉटर) रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील नदीनाल्यांच्या पात्रात शिरते. यामुळे पिकांचे नुकसान होते आणि जीवितहानी होण्याची भीती असते. अशा वेळी तापी नदी पात्रात हतनूर प्रकल्पाचे पाणी सर्व ४२ दरवाजे एकाच वेळी उघडून प्रकल्पातील साठा कमी केला जातो. हे पाणी सोडताना या सर्व २५ गावांना एकाच वेळी धोक्याचा इशारा हतनूर प्रकल्पावरूनच देण्यात येणार आहे. 

‘या’ गावांत यंत्रणा कार्यान्वित व्हावी 
हतनूर प्रकल्पाचे पाणी तापी नदीपात्रात सोडताना पाण्याचा प्रचंड प्रवाह नदीपात्रात सोडला जातो. यामुळे हतनूर प्रकल्पाखालील गावांना धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा बसवणे योग्यच आहे. मात्र, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील धरणाच्या वरील असंख्य गावांना हतनूरच्या बॅकवॉटरचा फटका बसतो. अनेकदा प्रकल्पाच्या पाण्याची पातळी मध्यरात्री वाढते आणि रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य गावांमध्ये हे बॅक वॉटर शेतीक्षेत्रात आणि काही नागरी वस्त्यांमध्ये शिरते. अजनाड, दोधे, नेहता, विटवा, निंबोल, ऐनपूर, धुरखेडा या नदीकाठावरील लोक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन असतात. नेहता गावाच्या चारही बाजूला अनेकदा पाण्याचा वेढा असतो. अशा वेळेस या गावांमध्ये देखील ही आपत्कालीन डिजिटल दवंडी यंत्रणा बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील आणि नेहता येथील सरपंच महेंद्र पाटील यांनी केली आहे. 

संपादन- राजेश सोनवणे