esakal | मुलीला फक्‍त आली चक्‍कर..निदानानंतर रिपोर्ट आले अन्‌ आई- वडीलांच्या पायाखालची सरकली जमीन 
sakal

बोलून बातमी शोधा

blood cancer

मुलगी वंशिका प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहे. अचानक तिची तब्बेत बिघडल्याने तिला अमळनेर येथे दवाखान्यात दाखविण्यात आले. डॉक्‍टरांनी वंशिकाचा रिपोर्ट दाखविल्‍यानंतर तिच्या आई- वडिलांना धक्काच बसला.

मुलीला फक्‍त आली चक्‍कर..निदानानंतर रिपोर्ट आले अन्‌ आई- वडीलांच्या पायाखालची सरकली जमीन 

sakal_logo
By
प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (ता. अमळनेर) : येथील सर्व सामान्य कुटुंबातील माहेरवासीन अर्चना महाजन हिची मुलगी वंशिकाला अचानक ब्लड कँसर असल्‍याचे निदान समोर आले. अशात घरात अठराविश्व दारिद्र्य; त्यात दोन वेळ खायचे वांदे असताना उपचारासाठी कुठे घेऊन जावे या विवंचनेत आई होती. अशातच कळमसरे गावातील तरुणांनी क्षणाचाही विचार न करता वंशिकाला नाशिक येथे उपचारासाठी हलविले. अन्‌ मायेची ऊब देत तिला मदतीसाठी धावून आल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कळमसरे येथील पौलाद माळी यांची कन्या अर्चना राजेंद्र महाजन हिला सासरी कुठलाही सहारा नसल्याने कळमसरे येथे आपल्या माहेरी पतीसोबत येऊन राहते. तिचा पती राजेंद्र महाजन हे गाडी चालक असून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांचे घर चालत असते. त्यांची मोठी मुलगी वंशिका प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहे. अचानक तिची तब्बेत बिघडल्याने तिला अमळनेर येथे दवाखान्यात दाखविण्यात आले. त्यावेळी वंशिकाला ब्लड कँसर असल्याचे डॉक्टरानी सांगताच तिच्या आई- वडिलांना धक्काच बसला. मात्र गावातील तरुणांनी एकत्र येत तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले.

सोशल मिडीयावर आवाहन अन्‌ गावकऱ्यांची मदत
वंशिकाला ब्लड कँसर झाल्याचे समजताच तिला उपचारासाठी नाशिक हलविल्याने गावाच्या सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन तरुणाईने केले. गावात तसेच उद्योगधंद्यानिमित्त बाहेर असलेल्या गावकऱ्यांनी पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीचा ओघ वंशिकाचे वडील राजेंद्र महाजन यांच्या बँक खात्यात सुरू झाला आहे. मात्र अजूनही वंशिकाला उपचारासाठी मोठ्या मदतीची गरज असून दात्यांनी मदत करावी यासाठी कळमसरे येथील तरुणाईने आवाहन केले आहे.

गावात फिरविली झोळी
वंशिकाला मोठ्या मदतीची गरज असल्याने गावातील तरूणाईने आज कळमसरे गावात झोळी फिरवून आर्थिक मदत संकलित करण्यास सुरवात केली आहे. गावातील व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत असल्याने एका सामान्य कुटुंबातील माहेरवाशीनला गावकऱ्यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे अर्चना व तिचे पती राजेंद्र महाजन यांना याप्रसंगी अश्रू अनावर झाले होते. 

संपादन ः राजेश सोनवणे