निवडणुकीतील ‘काटे की टक्कर’ या शब्‍दाचा उगम याच गावातून

उमेश काटे
Friday, 15 January 2021

गावाची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे. गावात कुणबी- मराठा, कोळी, भिल्ल, बौद्ध, मातंग समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. यात बहुसंख्य कुणबी- मराठा समाजातील काटे आडनावाचे सुमारे ९० टक्के लोक आहेत.

अमळनेर (जळगाव) : निवडणूक कोणतीही असो त्यात वातावरण नेहमीच तप्त होते. ग्रामपंचायतीत तर ती अधिकच रंगते. त्यामुळे आमने सामने असणाऱ्या उमेदवारांमध्ये नेहमीच ‘काटे की टक्कर’ असते असे बोलले जाते. मात्र ‘काटे की टक्कर’ या वाक्याचा उगम कोठून झाला असेल यात अनभिज्ञता आहे. मात्र कोळपिंप्री (ता. पारोळा) येथे "काटे" आडनावाचे सुमारे ९० टक्के लोक गावात राहतात. भाऊबंदकी एकसुतकी असली तरी ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच रंगतदार व जोमात होते. आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत ‘काटे’मध्येच खऱ्या अर्थाने ‘काटे की टक्कर’ दिसून येत आहे. जणू काही यावरूनच ‘काटे की टक्कर’ या वाक्याचा उगम झाल्या असल्याचा जावईशोध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

कोळपिंप्री (ता. पारोळा) या गावाची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे. गावात कुणबी- मराठा, कोळी, भिल्ल, बौद्ध, मातंग समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. यात बहुसंख्य कुणबी- मराठा समाजातील काटे आडनावाचे सुमारे ९० टक्के लोक आहेत. विशेष म्हणजे हे सर्व एकसुतकी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासत आहेत. परिणामी ग्रामपंचायत स्थापनेपासून एक अपवाद वगळता केवळ काटे आडनाव असलेलेच सरपंच राहिलेले आहेत. बहुसंख्य महिला- पुरुष काटेसह "पाटील" हे आडनाव लावतात. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीत नऊ सदस्य संख्या आहे. यात तीन वार्ड असून प्रत्येक वार्डात तीन - तीन सदस्य आहेत. वार्ड क्रमांक ३ मध्ये केवळ एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून तिथे भिल्ल समाजाचे प्राबल्ल असते. इतर आठ जागांमध्ये जनरल स्री- पुरुषसह इतर मागासवर्गीय स्री- पुरुष यासाठी आरक्षित असून सर्वच जागेवर काटे आडनावाचे स्री- पुरुष उभे राहतात. परिणामी निवडणुकीच्या रणांगणात १८ पैकी १६ उमेदवार हे काटे आडनावाचे आहेत. यात एकच भाऊबंदकी असल्यामुळे बहुतेक वेळा भाऊ विरूद्ध भाऊ, दिरानी विरूद्ध जेठानी, काका विरूद्ध पुतण्या, सासू विरूद्ध सून या नात्यामध्ये टक्कर असते. म्हणजेच खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीत ‘काटे’मध्येच ‘काटे की टक्कर’ दिसून येत आहे. भाऊबंदकी एक असली तरी निवडणूक बिनविरोध का होत नाही यावर ग्रामस्थ सांगतात की, निवडणुका झाल्या तरच लोकशाही जिवंत राहते. लोकशाहीला खतपाणी घालण्याचे काम निवडणुकीच्या माध्यमातून सर्वजण करीत असतात. दोन दिवसांची निवडणूक संपल्यानंतर दोन्ही गटांतील ग्रामस्थ मतभेद विसरून एकत्र येतात. मतभेद असले तरी कधीही मनभेद नसतो.

नावात काय असते? 
नावात काय असते? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. मात्र नावात बरेच काही असते याचा जणू काही प्रत्यक्ष प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही, कारण गावात निवडणूक अखेर भाऊबंदकीतच जुंपते. कोळपिंप्री या गावात लोकमान्य व प्रगती पॅनलमध्ये सरळ लढत असून वार्ड एकमध्ये सुनिल प्रतापराव काटे (पाटील) विरूद्ध सुनिल कन्हैयालाल काटे, गणेश भिकन काटे (पाटील) विरूद्ध शशिकांत देविदास काटे, सरला दिलीप काटे (पाटील) विरूद्ध मनिषा सतिष  काटे (पाटील). वार्ड दोन मध्ये चतुर रामचंद्र  काटे (पाटील) विरूद्ध दिपक माधवराव  काटे (पाटील), प्रतिभा योगीराज  काटे (पाटील) विरूद्ध बेबाबाई नगराज  काटे (पाटील),  रुपाली सुनिल  काटे (पाटील) विरूद्ध सुनिता महेश  काटे (पाटील). वार्ड तीन मध्ये सुनिता सुरेंद्र काटे (पाटील) विरूद्ध पूजा प्रमोद काटे (पाटील), रेखाबाई घनश्याम काटे (पाटील) विरूद्ध कल्पना दत्तात्रय काटे (पाटील), छबिलाल भिल विरूद्ध महेंद्र भिल असा सामना रंगणार आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news amalner gram panchayat election kate ki takkar word history