तीन राज्यांना जोडणारा ‘दुवा’ उपेक्षित; बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राज्यमार्गाचे ‘ग्रहण’ सुटेना

ankleshwar barhanpur highway
ankleshwar barhanpur highway
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील महामार्ग व राज्यमार्गाच्या चौफेर होणाऱ्या कामांमध्ये बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर या महत्त्वाच्या व तीन राज्यांना जोडणाऱ्या मार्गाचा कुठेही समावेश नाही. १२ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होऊनही या राज्यमार्गाचे ग्रहण सुटायला तयार नाही. राष्ट्रीय महामार्ग नसल्याने महामार्ग विकास प्राधिकरण त्यात लक्ष घालत नाही आणि राज्याचा विषय असला तरी निधीअभावी रस्त्याचे रुंदीकरण कठीण, अशी या मार्गाची अवस्था आहे. 
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राज्य महामार्गाचा उल्लेख होतो. तीन राज्यांतील विशेषत: मालवाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. 

चारशे किलोमीटरचा मार्ग 
बऱ्हाणपूरपासून रावेर, सावदा, फैजपूर, अडावद, चोपडा, शिरपूर, शहादामार्गे हा राज्य महामार्ग गुजरातेत अंकलेश्‍वरपर्यंत जातो. बऱ्हाणपूरपासून अंकलेश्‍वरपर्यंत ३८९ म्हणजे जवळपास ४०० किलोमीटर टप्प्यातील हा मार्ग. बऱ्हाणपूर- रावेर टप्प्यात चोरवडपर्यंत मध्य प्रदेशची हद्द. त्यापुढे महाराष्ट्राची हद्द सुरू होऊन नंदुरबारच्या पुढे अशा जवळपास २७० किलोमीटर अंतर कापत हा मार्ग राज्यातून जातो. 

मालवाहतुकीवर भर 
गुजरात मोठे व्यापारी राज्य आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेश कृषीवर निर्भर प्रांत. अशा तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग. व्यापारी पेठ आणि कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक याच मार्गावरून होते. मुंबईकडून मध्य प्रदेशाकडे जाणारी वाहने शिरपूरपासून वळण घेत याच मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे मोठे ट्रक, कंटेनर, डंपर यांसारख्या वाहनांची या मार्गावरून मोठी वर्दळ असते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गाची दुरुस्तीही वारंवार करावी लागते. याशिवाय मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील काही भागातून गुजरातला जाणाऱ्या प्रवासी वाहनांसाठीही हा मार्ग सोयीचा आहे. 

..तरीही उपेक्षितच! 
या महामार्गाच्या राष्ट्रीय महामार्गातील रूपांतर व पर्यायाने चौपदरीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. तीन राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मार्गाची देखभाल, दुरुस्ती असल्याने आपापल्या राज्यांत व त्यातही बांधकाम विभागाच्या त्या- त्या जिल्हा विभागाकडे रस्त्याचे काम असल्याने या मार्गाला कधीही योग्य न्याय मिळालेला नाही.  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com