
शेतकरी व शेतमजुरांनी प्रक्रियेचा मार्ग शोधला आहे. शेताच्या बांधावरच बनाना चिप्स अर्थात केळीचे वेफर्स तयार करण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे.
जळगाव : केळी लागवडीसह उत्पादनात आघाडी असल्याने बनाना सिटी म्हणून जळगावची एक वेगळी ओळख आहे. परंतु केळी पिकातील प्रक्रियेच्या बाबतीत नव प्रक्रियेत जिल्हा मागेच होता. मात्र शेतकऱ्यांनी आता स्वतः पुढाकार घेऊन कमी खर्चात "बनाना चिप्स' निर्मितीला चालना दिली. या नव प्रक्रियेचा अभाव असताना वापसी केळी पूर्वी व्यापारी खरेदी करीत नव्हते; परंतु चिप्ससाठी मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्यानंतर वापसी केळीला आता चांगले दर मिळू लागले आहेत.
जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीच्या उत्पादित दर्जेदार केळी ट्रक तसेच रेल्वे वाहतुकीने दिल्ली, पंजाब, हरियाना, पाकिस्तानात पाठविली जाते. केळी मोजणीच्या वेळी लहान आकाराच्या व कमी वजनाची केळी फेकली जाते. यामुळे ही केळी वाया जात होती. अशा प्रकारच्या केळीचे प्रमाण हे पाच ते 10 टक्क्यांपर्यंत होते. व्यापारी फक्त मोठ्या आकाराची केळी खरेदी करीत असल्याने लहान आकाराच्या वापसी केळींचे करायचे काय? याचा विचार करताना केळी उत्पादकांच्या नाकीनऊ येत असतात. या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेतमजुरांनी प्रक्रियेचा मार्ग शोधला आहे. शेताच्या बांधावरच बनाना चिप्स अर्थात केळीचे वेफर्स तयार करण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून या वापसी केळीचे मूल्यवर्धन साधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. प्रति एक किलो चिप्स तयार करण्यासाठी साधारणतः अडीच ते तीन किलो कच्च्या केळीची गरज भासते. वापसी केळीला देखील प्रति क्विंटल चांगला दर मिळू लागला आहे.
चिप्सला वाढती मागणी
पिकते तिथे विकत नाही असे म्हणतात. त्यानुसार केळीपासून चिप्स तयार केल्यानंतर त्यांना ग्राहकवर्ग मिळेल किंवा नाही, चिप्सला किती काळ मागणी असेल, चांगले दर मिळतील का, असे अनेक प्रश्न केळीवर प्रक्रिया करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात होते. अंदाज येत नसल्याने अनेकांनी स्वतःच्या शेतात केळी असूनही चिप्स तयार करण्याचे टाळले होते. काहींनी मोठ्या धाडसाने रहदारीच्या रस्त्यालगत शेताच्या बांधावर केळीपासून चिप्स निर्मितीसाठी सुरवात केली. अपेक्षेनुसार प्रारंभी चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण लहान मुलांना खाऊ म्हणून चिप्सची विक्री होवू लागली. मात्र कालांतराने उपवासाच्या फराळासाठी केळीचे चिप्स खरेदी करण्याकरिता विशेषतः महिला ग्राहकांची पसंती मिळू लागली. परिणामी टप्प्याटप्प्याने सर्वत्र केळी प्रक्रियेला गती मिळू लागली. महाशिवरात्र, एकादशी तसेच अन्य उपवासांच्या दिवसांचे औचित्य साधून शेतकऱ्यांनीही मागणीनुसार केळीपासून जास्तीतजास्त चिप्स निर्मितीला चालना दिली.
एक किलो चिप्सचे अर्थकारण
बनाना चिप्स तयार करण्यासाठी साधारणतः तीन किलो कच्च्या केळीची आवश्यकता असते. त्यासाठी वापसी केळी वापरली जात असल्याने सरासरी पाच ते सहा रुपये प्रति किलो दराप्रमाणे एक किलो चिप्स तयार करताना पंधरा ते वीस रुपये खर्च कच्च्या केळीवर होतो. स्वतःच्या शेतातील केळी असल्यास केळी खरेदीवरील पैसे वाचतात. तेल, सैंधव मीठ, मिरची आदी घटकांवर वीस रुपये खर्च होतो. अशा प्रकारे प्रति किलो चिप्सनिर्मितीसाठी शेतकऱ्यास साधारण ४० ते ५० रुपये खर्च येतो. अर्थात शंभर रुपये प्रति किलोप्रमाणे चिप्स विकल्यास खर्च वजा जाऊन सुमारे ५० रुपये नफा सहज शिल्लक राहतो. दिवसभरातून एका व्यावसायिकाला किमान सातशे ते आठशे रूपयांचा नफा मिळत असतो.
समान दर
जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तसेच अन्य सर्व तालुक्यांतून अलीकडे केळीपासून चिप्स् तयार करण्यास चांगला वेग आला आहे. छोटेखानी चिप्सनिर्मिती व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा असली तरी कोणीच दर कमी- जास्त करत नाही. जिल्ह्यात कुठेही गेले तरी चिप्सचे दर समान आहेत. गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता केळी उत्पादकांनी उत्पादनखर्चाचा विचार करून चिप्सचा दर सगळीकडे 100 रुपये प्रति किलोप्रमाणे समान ठेवला आहे, त्यामुळे कोठेही गेल्यावर एकच दर पाहण्यास मिळतो.
अनेकांच्या घराचा उदरनिर्वाह
शेतमजुरीवर घर संसार भागविणे कठिण असते. यामुळे अनेकांनी केळी वेफर्स व्यवसाय करण्याचे ठरविले आणि या व्यवसायात उतरले. त्यांना दररोज खर्च जावून केळी वेफर्स व्यवसायातून सरासरी निघराणा नफा हा घराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी होतो.
चिप्स निर्मिती व्यवसायाची वैशिष्ट्ये
- केळीपासून चिप्स निर्मिती करणाऱ्यांची संख्या सुमारे ५०० च्या घरात.
- प्रत्येकाकडून दररोज चिप्सची निर्मिती सरासरी २० किलो.
- दैनंदिन आर्थिक उलाढाल शंभर रुपये प्रति किलोप्रमाणे अंदाजे दहा लाख रुपये.
- चिप्स निर्मितीसाठी लागणारी कच्ची केळी- अंदाजे २०० क्विंटल.
उन्हाळ्यात मजुरीचे काम नसल्याने केळी वेफर्स व्यवसाय करण्याची संकल्पना सुचली. यातून केळी वेफर्स निर्मितीला सुरवात केली. या कष्टाचे चीज झाले असून व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. घर खर्च भागेल इतका नफा यातून दररोज मिळत असल्याने समाधान आहे.
- रंजना पावरा, केळी चिप्स उत्पादक.