धक्‍कादायक..पीकविमा भरूनही शेकडो केळी उत्पादक लाभापासून वंचित; पोर्टलवर नोंदीच नाहीत 

दिलीप वैद्य
Tuesday, 23 February 2021

कर्जदार शेतकरी असल्यामुळे २०२०-२१ साठी पंतप्रधान फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नियमानुसार संबंधित बँकेत वेळेत संमतिपत्रसुद्धा दिलेले आहे. बँकेने नियमानुसार आम्हाला या योजनेत सहभागी करून घेतले आहे.

रावेर (जळगाव) : पंतप्रधान फळपीक विमा योजनेत २०२०-२१ या वर्षांसाठी सहभागी झालेल्या जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा विमा हप्ता कापला गेला, पण त्यांची माहिती शासकीय पोर्टलमध्ये समाविष्ट झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोर्टलवर माहिती अपलोड न झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची संभाव्य नुकसानभरपाई मिळणार नसल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, वंचित शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल पुन्हा सुरू करण्याची विनंती असंख्य केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (ता. २२) निवेदनाद्वारे केली आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की आम्ही सर्व केळी उत्पादक कर्जदार शेतकरी असून, आम्ही आमच्या केऱ्हाळे (ता. रावेर) गावातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतलेले आहे. आम्ही कर्जदार शेतकरी असल्यामुळे २०२०-२१ साठी पंतप्रधान फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नियमानुसार संबंधित बँकेत वेळेत संमतिपत्रसुद्धा दिलेले आहे. बँकेने नियमानुसार आम्हाला या योजनेत सहभागी करून घेतले आहे. तसेच आमच्या नावे शेतकरी हिश्शाची विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे वर्ग केलेली आहे; परंतु काही त्रुटींमुळे कंपनीने आमचा विमा नाकारला होता. आम्ही त्या संबंधित सर्व त्रुटींची पूर्तता बँकेत केली; परंतु आता आम्हाला बँकेतून अशी माहिती मिळाली आहे, की फळपीक विमा संबंधित पोर्टल बंद झाल्यामुळे त्रुटींची पूर्तता करता येत नाही. पोर्टल सुरू होईपर्यंत आम्हाला या योजनेत सहभाग नोंदविता येणार नाही. याबाबत शेतकऱ्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा. आम्ही फळपीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित पोर्टल सुरू करून आम्हाला या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. केऱ्हाळे येथील अमोल पाटील, डॉ. पी. जे. चौधरी, कैलास पाटील, जगदीश पाटील, गोपाल पाटील, किरण पाटील, रमेश पाटील यांनी हे निवेदन दिले. 

अशी आहे अडचण 
ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविमा काढायचा होता, त्यांची विमा हप्ता रक्कम त्या त्या बँकांनी ३० ऑक्टोबर २०२० ला बजाज अलियांज कंपनीकडे वर्ग केली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची मुदत १५ नोव्हेंबर होती. मात्र, शेतकऱ्यांच्या आधारकार्डमधील अडचणी, बँकेतील जुने खाते क्रमांक, सातबारा उताऱ्यातील फेरफार यामुळे माहिती वेळेत अपलोड झाली नाही. हे पोर्टल पुन्हा सुरू करण्यासाठी बँकांनी अग्रणी बँकेकडे प्रयत्न केले, पाठपुरावा केला मात्र, विमा कंपनीचे अधिकारी आडमुठेपणाच्या धोरणामुळे दाद देत नाहीत, अशी स्थिती असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
शेकडो शेतकरी वंचित 
अशा प्रकारे विम्याचा हप्ता कापला जाऊन माहिती पोर्टलवर अपलोड न होणाऱ्या युनियन बँकेच्या रावेर, केऱ्हाळे आणि तांदलवाडी या तीन शाखांतील ५०३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बँकांमधील असंख्य शाखांमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर असे वंचित शेतकरी आहेत. जिल्ह्यातील अशा वंचित शेतकऱ्यांची संख्या ही शेकडो असल्याने ते सर्व पीकविमा भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 
 
केळी उत्पादकांचा पीकविमा हप्ता कापला गेल्यानंतरही माहिती पोर्टलवर अपलोड होत नाही. ही विमा कंपनीची चूक आहे. आठवडाभरात माहिती अपलोड न झाल्यास आंदोलन करू. 
- अमोल पाटील, केळी उत्पादक शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news banana farmer no name crop insurance portal