शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग..केळी वाचविण्यासाठी शक्‍कल अन्‌ निसर्गाच्या लहरीपणावर मात 

banana farming
banana farming

चांगदेव (जळगाव) : येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यांत्रिक पद्धतीचा सतत उपयोग करणारे निवृत्त शिक्षक विश्‍वनाथ आनंद महाजन यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी आधुनिकतेची कास धरली. एका शेतात, एकाच वेळी, एकाच हंगामात चार- चार पिके घेण्याची किमया करत निसर्गाच्या लहरीपणावर मात केली आहे. त्यांची पीकपद्धत पाहण्यासाठी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने शेतीला भेट देत आहेत. 
मुक्ताईनगर ते चांगदेव रस्त्यावर दुधाळे मारुती मंदिराजवळ स्वामित्वाने केलेल्या सहा एकर शेतीत त्यांनी हा आधुनिक प्रयोग केला आहे. जुलै २०२० मध्ये या ठिकाणी केळी पिकाची लागवड केली; परंतु त्यावर सीएमव्ही रोगाची लक्षणे दिसल्याने चार महिन्यांची केळीबाग उपटून फेकावी लागली. त्यांनी हार न मानता पुन्हा नोव्हेंबरमध्ये नव्याने केळी लागवड केली. पुन्हा केळीबाग फेकावी लागली तर आर्थिकदृष्ट्या शेती करणे परवडेल का? अशी शंका त्यांचे पुत्र प्रमोद महाजन यांनी उपस्थित केली. त्यावर उपाय म्हणून त्यांनी कांदे बहार केळीसोबत बहुपीक पद्धतीची शेती करण्याचा विचार करून शेतीत रब्बी हंगामात हरभरा, सूर्यफूल, कोथिंबीर अशी लागवड केली. हेतू एकच केळीबाग फेकणे परवडणारे नसल्याने इतर पिकांसोबत उत्पन्नात भर पडेल आणि आर्थिक नुकसान होणार नाही, किमान लागवडीचा खर्च तरी निघेल, हा दृष्टिकोन बाळगून त्यांनी शेतीमध्ये बहुपीक पद्धतीचा उपयोग केला. 

ओलावा टिकविण्यासाठी असाही प्रयोग
हरभरा, सूर्यफूल काढल्यावर सूर्यफुलाची ताटे तशीच उभी राहू देणार असल्याने त्यांची गळून पडलेली पाने शेतावर आच्छादन देण्याचे काम करतील. परिणामी, पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन उन्हापासून बचाव होईल. सूर्यफुलाची मुळे वरच्या थरात खोलवर व पसरट असतात. फुले तुटल्यावर मुळे सुकल्यानंतर जमिनीत तयार होणाऱ्या पोकळीत पाणी साचून राहिल्याने सतत ओलावा टिकविण्यास मदत होते आणि या ओलाव्यामुळे केळीपीक उन्हाच्या तडाख्यात जळून न जाता थंडाव्याने बहरेल. यातूनच बहुपीक पद्धतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि उत्पन्नातसुद्धा भर पडणार असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. 
 
यापूर्वी बहुपिकाचा प्रयोग 
विश्‍वनाथ महाजन यांनी याआधीही केळीबागेत टरबूज, काकडी, मूग, चवळी, मेथी, कांदा, कोथिंबीर अशी अनेक पिके बहुपीक पद्धतीने यशस्वी घेतलेली आहेत. बुडत्याला काडीचा आधार या म्हणीचा येथे प्रत्यय येत असून, त्यांची निसर्गाशी यशस्वी झुंज देणे सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com