भाऊ आले ना मागचेच आश्‍वासन घेवून; मग महिलांनी केली फसगत, तरीही म्‍हणाले लक्ष असू द्या..वाचा काय घडला प्रकार

चेतन राजपूत
Thursday, 14 January 2021

पाच वर्षाचा कालावधी लोटला असून अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता परत तेच आश्वासन घेऊन उमेदवार निवडणुकीचा प्रचार करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भुसावळ (जळगाव) : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत आहे. हौसे नवसे अनेक उमेदवार निवडणुकीत उभे राहून आपले नशीब आजमावत आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला असून, मागील आश्वासने पूर्ण न झाल्याने उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार मागण्यासाठी मतदारांच्या दारी गेल असता मागील निवडणुकीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने संतप्त मतदारांनी या उमेदवारास शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच तालुक्याच्या आमदारांवर ही रोष व्यक्त केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. 

तापीच्या काठी तरी पाण्यासाठी भटकंती
कंडारी हे गाव तापी नदीच्या काठावर वसले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गावात पाणी पुरवठ्याची तीव्र समस्या भेडसावत आहे. नागरिकांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावातील पाणी पुरवठ्यासाठी ग्रामस्थांतर्फे वारंवार आंदोलने करण्यात आली. तावडे प्रशासनाने केवळ काम चलावू आश्वासने देऊन वेळ मारून नेली. मात्र पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. 

जलशुद्धीकरण केंद्रही बंद
गावातील जलशुद्धीकरण केंद्र हे कालबाह्य झाल्याने देखील बंद पडले आहे. यातून ग्रामस्थांना दूषित स्वरूपात पाणीपुरवठा केला जात होता; मात्र आता गेल्या चार महिन्यापासून हे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने गावातील विहिरीतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी हाल होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधींनी बाबत तीव्र रोष व्यक्त होताना दिसत आहे.

मागच्या निवडणुकीत आश्‍वासन पण
साकरी फाटा आणि गोलानी परिसर हा गावापासून दूर अंतरावर असल्याने या भागात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पाणी पुरवठ्याची अशी वेगळी व्यवस्था करण्यास अपयशी ठरली आहे. येथील नागरिकांना वर्षभर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी या भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. या पाच वर्षाचा कालावधी लोटला असून अद्यापही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता परत तेच आश्वासन घेऊन उमेदवार निवडणुकीचा प्रचार करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही गावातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार तरी कधी असा प्रश्न ग्रामस्थांतर्फे मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमोर उपस्थित केला जात आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal gram panchayat election women agresive candidate