जिल्हा परिषद सदस्याच मतदानापासून राहणार वंचित 

चेतन चौधरी
Friday, 15 January 2021

मतदार याद्या आणि ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. मात्र, महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

भुसावळ (जळगाव) : जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत आहे. यासाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. मात्र, मतदार यादीतून खुद्द जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांचे नाव वगळण्यात आहे. त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.१५) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी देखील केली असून, मतदार याद्या आणि ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे. मात्र, महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आल्याचे दिसून आले आहे. निंभोरा (ता. भुसावळ) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीतून जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांचे नाव गायब झाले आहे. 

विरोधकांचे कारनामे 
जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांचे मतदान निंभोरा गावात आहे. पण गुरुवारी (ता. १४) मतदार याद्या पाहिल्या असता त्यांचे नावच मतदार यादीत नसल्यामुळे पल्लवी सावकारे यांना चांगलाच धक्का बसला. यामागे प्रशासनाचा गलथानपणा आहे की विरोधकांनी प्रशासनाला हाताशी घेत माझे नाव गायब केले, असा आरोप पल्लवी सावकारे यांनी केला आहे. अंतिम प्रारूप यादीमध्ये पल्लवी सावकारे यांनी त्यांचे नाव असल्याची खात्री करून घेतली होती. याद्या प्रकाशित करण्यामध्ये जाणूनबुजून नाव गायब करण्यात आले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

जिल्हा परिषद/पंचायत समितीची २०१७ ची निवडणूक, एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा व ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये मी मतदानाचा हक्क बजावला. जर मी स्वतः जिल्हा परिषद सदस्या असून, माझे नाव जर गायब केले गेले असेल तर तालुक्यात अशा किती लोकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, याचा शोध घेऊन निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार आहे. गरज पडल्यास उच्च न्यायालयात जाणार. 
- पल्लवी सावकारे, जिल्हा परिषद सदस्य 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal gram panchayat election zilha parishad member not voter list