
ज्या चिमुकल्याला बोट घेवून चालवायचे. सुटीत घरी आल्यानंतर त्याच्यासोबत खेळायचे हे क्षण न विसणारे होते. पण आपल्या वडीलांना पुरेसे जाणून घेण्यापुर्वीच पाच वर्षाच्या चिमुकल्याला पित्याला अग्नीडाग देण्याची वेळ आली. मृत्यू झालेले देशाच्या जवानाला निरोप देतानाचे हे दृश्य पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले होते.
चाळीसगाव (जळगाव) : जम्मू- काश्मीर येथे सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना अंगावर भर पडल्याने वाकडी तालुका चाळीसगाव येथील जवान अमित साहेबराव पाटील हे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आज त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा भूपेश यांनी वडिलांना अग्निडाग दिला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
वाकडी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी साहेबराव नथ्थू पाटील यांचे मोठे चिरंजीव अमित साहेबराव पाटील हे 2010 मध्ये बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये कार्यरत झाले होते. जम्मू- काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली. यात ते जखमी झाल्याने त्यांना तात्काळ बीएसएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून सर्वसामान्य परिस्थितीत त्यांनी हालाखीची जीवन जगत सैन्य भरतीत रुजू झाले होते.
सकाळी पार्थिव मुळगावी
जवान अमित पाटील यांचे पार्थिव जम्मू- काश्मीरवरून इंदौर येथे व त्यानंतर धुळ्यावरून सकाळी नऊला चाळीसगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर चाळीसगाव येथे त्यांच्या मूळ गाव वाकडीपर्यंत त्यांची पार्थिवाची सवाद्य मिरवणूक काढून त्यांच्या शेतात त्यांना अग्नीडाग देण्यात आला. यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. जवान अमित पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च व पूर्ण जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण हे उचलणार असल्याचे मत यावेळी त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.
संपूर्ण तालुका हळहळला
महिन्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव व वाकडी येथील दोन जवान देशाच्या कामी आले. हे दोन्ही जवान शहीद झाल्याने यामुळे संपूर्ण चाळीसगाव तालुका हळहळला. वीर जवान अमित पाटील यांची चाळीसगाव ते थेट वाकडी गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चाळीसगाव वाघडू व वाकडी या गावांमध्ये सडा- रांगोळी टाकण्यात आली. तसेच यावेळी शहीद अमित पाटील यांना पोलिस प्रशासन व बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सच्या वतीने सलामी देण्यात आली.
संपादन ः राजेश सोनवणे