
कोरोनाची लस दाखल झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी नियमानुसार दोन वेळा ही लस घेतली.
चाळीसगाव (जळगाव) : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. बाविस्कर यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, तालुक्यात सोमवारी कोरोनाचे ७१ रुग्ण आढळल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाची लस दाखल झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी नियमानुसार दोन वेळा ही लस घेतली. मात्र, त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी (ता. २२) तपासणीदरम्यान निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. बाविस्कर सध्या होम क्वारंटाइन असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
कारवाईचा बडगा पण प्रादुर्भाव वाढता
सध्या शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. शिवाय, लग्नात गर्दी दिसून येणाऱ्या मंगल कार्यालयांमध्ये धडक देऊन मंगल कार्यालयांच्या मालकांविरुद्धही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाया होऊनही नागरिकांकडूनच नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाउनच्या भीतीने..
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्या लॉकडाउनचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. संभाव्य लॉकडाउन लक्षात घेता, अनेक दुकानदारांनी आपापल्या दुकानांमध्ये जास्तीचा माल भरून ठेवण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, पालिका व पोलिस प्रशासनाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या १३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७३ हजारांचा दंड वसूल केला.
संपादन ः राजेश सोनवणे