नोंदणीच्या वीस टक्‍केच माल खरेदी

आनन शिंपी
Friday, 8 January 2021

केंद्र सरकारने पाच वेळा स्मरणपत्र पाठवून देखील राज्याने माहिती दिली नाही. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांसह पणनमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच मार्केटिंग फेडरेशनला तत्काळ पत्र देऊन उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची विनंती केली आहे.

चाळीसगाव (जळगाव) : खरिप हंगाम २०२०- २१ साठी तालुक्यातील ५६० शेतकऱ्यांनी मका, १२३ शेतकऱ्यांनी बाजरी व ११२ शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी नोंदणी केली होती. पैकी, केवळ ८० शेतकऱ्यांचा मका, ३९ शेतकऱ्यांची बाजरी व ६२ शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी शासनाने केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शासनाचे खरेदी उद्दिष्ठ संपल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे. एकूण नोंदणीच्या २० टक्के देखील मका, ज्वारी, बाजरी खरेदी झालेली नसल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. 
केंद्र सरकारने पाच वेळा स्मरणपत्र पाठवून देखील राज्याने माहिती दिली नाही. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्र्यांसह पणनमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच मार्केटिंग फेडरेशनला तत्काळ पत्र देऊन उर्वरित नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची विनंती केली आहे. असे असतानाही खरेदी केली जात नसल्याने महाविकास आघाडीकडून शेतकरी प्रेमाचा दिखावा केला जात असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. 

पाच वेळी स्‍‍मरणपत्र
या संदर्भात माहिती देताना आमदार चव्हाण यांनी सांगितले, की केंद्र सरकारने मका आणि ज्वारी खरेदीची तयारी वारंवार दर्शवलेली असतानाही राज्य सरकार योग्य ती माहिती देत नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने केंद्र शासनाने पाच वेळा स्मरणपत्र पाठवून देखील राज्य शासनाने खरेदी केलेल्या मालाची वितरण व्यवस्था कशी असेल याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारला मका, ज्वारी, बाजरीचे वाढीव उद्दिष्ठ देता येत नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon mla mangesh chavan farmer cotton corn