
जिल्हा रूग्णालय म्हटले म्हणजे अगदी रूग्णाला दाखल करणे म्हणजे जिकरीचे. यात दाखल रूग्णाला भेटण्यासाठी जाणे म्हणजे फिराफिर निश्चित. पण जळगावच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात येणाऱ्या आता सुखद अनुभव मिळू लागला आहे; हे का आणि कशामुळे होतेय हे जाणून घ्या.
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवेसाठी रोज येत आहेत. परिसरात मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या जनसंपर्क कक्षातून नागरिक, दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य माहिती मिळत असल्याने हेलपाट्या कमी झाल्या आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
केसपेपर काढण्यासाठी महिला व पुरुषांची वेगळी रांग आणि कायदेशीर प्रकरणासाठी (एमएलसी) तिसरी खिडकी सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचा वेळ वाचत आहे. तसेच रुग्णांसह नातेवाइकांना नागरिकांना माहिती देण्यासाठी आवारातच जनसंपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नातेवाइकांना रुग्णाची माहिती मिळणे, ओपीडी, योजनांविषयी, रुग्णालय व महाविद्यालयातील सोयी-सुविधांविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या रुग्णांसह नातेवाइकांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. रुग्णालय अद्ययावत होत असल्याने पूर्वीचे ‘सिव्हिल’ आता अधिकच बदलले आहे.
केसपेपरची सुविधा सोयीची
रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्रमांक एकसमोर केसपेपरच्या विभागाची सुविधा केल्यामुळे गर्दी नियंत्रित राहून रुग्णांसह नातेवाईक सुखावले आहेत. येणाऱ्या रूग्णांना केसपेपर काढणे सोपे होवून उपचार लवकर घेण्यास मदत होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे