थंडीची लाट आणखी आठवडाभर

राजेश सोनवणे
Friday, 25 December 2020

हिवाळ्याला सुरवात झाल्‍यापासून यंदा जिल्‍ह्‍यातील तापमान प्रथमच दहा अंश सेल्‍सिअसवर पोहचले आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे काहीसा उकाडा जाणवल्‍यानंतर तुरळक पावसामुळे हवेतील गारठा अधिकच वाढला होता.

जळगाव : थंडीचा कडावा चांगलाच जाणवू लागला आहे. साधारण आठवडाभरापासून थंडीत वाढ झाली असून पारा खाली घसरला आहे. तीन- चार दिवसांपासून जळगाव जिल्‍ह्‍यातील पारा दहा अंशावर कायम राहिला असून, आज तापमान नऊ अंश सेल्‍सिअसवर आले.
हिवाळ्याला सुरवात झाल्‍यापासून यंदा जिल्‍ह्‍यातील तापमान प्रथमच दहा अंश सेल्‍सिअसवर पोहचले आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे काहीसा उकाडा जाणवल्‍यानंतर तुरळक पावसामुळे हवेतील गारठा अधिकच वाढला होता. यानंतर थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला. आजदेखील जिल्‍ह्‍यात थंडीची लाट कायम असून किमान आठवडाभर थंडीची लाट कायम राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

रात्री गार वाऱ्यांची धुळूक
दिवसभर हवेत गारवा जाणवत असून दुपारचे ऊन देखील कोवडे वाटत आहे. परंतु, सायंकाळी सहा वाजल्‍यानंतर तापमान हळूहळू खाली घसरून थंडी जाणवू लागले. शिवाय, गार वाऱ्यांमुळे अंगाला अधिकच गारवा असल्‍याने हुडहुडी जाणवत आहे. घरात बसून राहिल्‍यानंतर देखील अगदी अंगात स्‍वेटर, कानटोपी परिधान करून नागरीक बसत आहेत.

रब्‍बीला होणार फायदा
शेतीच्या दृष्‍टीने रब्‍बी हंगामाला थंडीचा फायदा होणार आहे. यात गहू, हरभरा या पिकांसाठी थंडी अधिक फायद्याची ठरणार आहे. आठवडाभरापुर्वी बेमोसमी पाऊस पिकांसाठी नुकसानकारक होता. यानंतर थंडीचे प्रमाण वाढल्‍याने गहू, हरभऱ्यासाठी फायदा होणार आहे.

असे असू शकते तापमान
२६ डिसेंबर...९ अंश
२७ डिसेंबर...९ अंश
२८ डिसेंबर...८ अंश
२९ डिसेंबर...७ अंश
३० डिसेंबर...७ अंश
३१ डिसेंबर...८ अंश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news cold wave for another week