शासकीय दप्तर घरात ठेवणे भोवले; पाच ग्रामसेवकांची कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

ग्रामसेवकांवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले. यानंतर पाच नगरसेवकांना लागलीच ताब्‍यात घेत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी सरकारी दफ्तर बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते. बेकायदेशीरपणे दप्तर ठेवण्याचे प्रकरण ग्रामसेवकांना भोवले असून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी याप्रकरणाची गंभीर दाखल घेऊन सदर ८ ग्रामसेवकांवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले. यानंतर पाच नगरसेवकांना लागलीच ताब्‍यात घेत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पाच वर्षाचे दप्तर स्‍वतःकडे अन्‌ अशी झाली शिक्षा
ग्रामसेवकांकडे सन २०१५ ते सन २०२० पावेतोचे शासकीय दप्तर बेकायदा ताब्यात ठेवलेले आहे. वेळोवेळी संधी देत मागणी करून तसेच खटल्याचे कामकाज सुरु असतानाही संधी देऊनही दफ्तर जमा केले नाही. त्यामुळे सदरचे शासकिय दप्तर संबंधितांना अटक करून दप्तर जमा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १७९ (२) नुसार दप्तर देईपर्यंत किंवा ३० दिवसांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या आठ पैकी कर्तव्यावर गैरहजर असलेले झुरखेडा ग्रामपंचायतीचे विनायक चुडामण पाटील आणि डोणगाव (ता.धरणगाव) येथील ग्रामसेवक अनिल कचरू जावळे हे उपस्‍थित नव्हते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

कारवाई झालेले ग्रामसेवक
जळगाव जिल्ह्यातील आठ ग्रामसेवक यात राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सिम, बोदवड), सुभाष रामलाल कुंभरे (धौडखेडा, ता. बोदवड), सुरेश दत्तात्रय राजहंस (वरखेड, ता. बोदवड), गणेश रामसिंग चव्हाण (जुनोने दिगर, ता. बोदवड), राहुल नारायण पाटील (आमदगाव, ता. बोदवड), नंदलाल किसन येशीराया (लोंजे, ता. चाळीसगाव) आदी तत्कालीन ग्रामसेवकांवर शासकीय दप्तर बेकायदा ताब्यात ठेवणे प्रकरणी कारवाई करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यावेळी जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास शेंडे व पीएसआय प्रदीप चांदेलकर, पो.काँ. योगेश ठाकुर, नरेंद्र दिवेकर, होमगार्ड मधुकर मोरे, स्वप्निल सपके, प्रशांत शिंपी, महिला होमगार्ड सुजाता ठाकुर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ८ ग्रामसेवकांवर कारवाई झाल्याचा महाराष्ट्रातील पहिलाच खटला मानला जात आहे. आठ पैकी कर्तव्यावर गैरहजर असलेले विनायक चुडामण पाटील (झुरखेडा, ता. धरणगाव), अनिल कचरू जावळे (डोणगाव, ता. धरणगाव) हे आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान डी. एस. इंगळे (वडजी, ता. बोदवड) यांना त्रास होत असल्याने त्यांचे दप्तर ताब्यात घेण्यात येऊन त्यांना चार दिवसांची संधी देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news collector abhijit raut five gramsevak jail government backpack in the house