
मोदी सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी : नाना पटोले
फैजपूर (जळगाव) : इंग्रजांविरूध्द स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तर आता देखील कृषी कायद्यांचे दहन याच पवित्र भूमित करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी कायदे करून केंद्र सरकार अन्यायच करत आहे. केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (jalgaon-congress-melava-faizpur-nana-patole-target-modi-goverment)
हेही वाचा: नानासाहेब, स्वबळावर लढायला ‘बळ’ कोठून आणणार?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळावा होत आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रदेशा कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.
नाना पटोले म्हणाले, की फैजपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. येथे ब्रिटीशांच्या विरूध्दचा लढा सुरू असतांना अधिवेशन घेण्यात आले होते. आता याच भूमित केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन केले. हे तिन्ही कायदे शेतकर्यांच्या विरूध्द असून दिल्ली येथे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू असतांनाही पंतप्रधान त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाहीत. अशा अत्याचारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे कायद्यांच्या मसुद्याचे दहन केले असल्याची माहिती पटोले यांनी सांगितले.
२०२४ मध्ये जनता धडा शिकवेल
फैजपूर येथे काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन घेण्यात आले होते. तेव्हाचा लढा हा इंग्रजांच्या विरूध्द होता. तर सध्याचे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप पटोले यांनी केला. देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून मोदी सरकारला २०२४ साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी केला. महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून मार्च महिन्यात देशात सर्वत्र चिता पेटल्या असतांना पंतप्रधान हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात लागले होते. सरकारच्या या दंडेलशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहोत.
हेही वाचा: खेडगाव येथील जवान हुतात्मा
ओबीसींना आरक्षण नाकारण्याचे पाप फडणवीस सरकारचे
ओबीसी आरक्षणाबाबत नाना पटोले म्हणाले, की ७३ व्या घटना दुरूस्तीमुळे पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक एक दिवसही पुढे ढकलली जात नाही. मात्र एका परिपत्रकाचा संदर्भ घेऊन संविधानाचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर दोन वर्षाआधी कोर्टाने निर्णय दिला. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोग नेमला नाही. ओबीसींना आरक्षण नाकारण्याचे पाप हे त्याच सरकारचे असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ओबीसींना संपविण्याचे काम भाजप करत असल्याचेही ते म्हणाले.
फैजपुर येथे कृषी विषयक कायद्याच्या मसुद्यांची होळी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून फैजपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेळावा सुरू होण्यापुर्वी केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याच्या मसुद्याची होळी करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत.