डॉ. पाटील रुग्णालयातही ‘आरटीपीसआर टेस्ट’; २४ तासांत मिळणार अहवाल 

सचिन जोशी
Friday, 18 December 2020

नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेच्या उच्चतम मानांकनाच्या दिशेने वाटचाल करणारी अत्याधुनिक मॉलिकुलर डायग्नोस्टिक प्रयोगशाळा रुग्णांच्या सेवेत आहे.

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसह कावीळ व क्षयरोगाचे अचूक निदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. 
नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेच्या उच्चतम मानांकनाच्या दिशेने वाटचाल करणारी अत्याधुनिक मॉलिकुलर डायग्नोस्टिक प्रयोगशाळा रुग्णांच्या सेवेत आहे. सोमवारपासून या प्रयोगशाळेत कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसह अन्य महत्त्वपूर्ण चाचण्या सुरू करण्यात आल्या असून, त्यामुळे अचूक निदान होऊन त्वरित उपचाराची दिशा ठरविण्यास मदत होईल. 

उच्च मानांकन प्राप्त 
संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या संकल्पनेतून या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. उच्चतम गुणवत्तेचे प्रमाण देणारी नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या संस्थेचे मानांकन प्राप्त करण्याच्या दिशेने ही प्रयोगशाळा वाटचाल करीत आहे. 

२४ तासांत अहवाल 
यूएसए बेस्ड अत्याधुनिक यंत्रणा प्रयोगशाळेत कार्यान्वित करण्यात आली आहे. रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यांना २४ तासांत आजाराचे निदान करणारा रिपोर्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दैनंदिन किमान ५०० रक्तांचे नमुने या प्रयोगशाळेत तपासणी केले जाणार आहेत. 
 
...असे आहेत तंत्रज्ञ 
या प्रयोगशाळेत लॅब डायरेक्टर म्हणून डॉ. कैलास वाघ, क्वालिटी मॅनेजर म्हणून डॉ. प्रशांत गुड्डेती, टेक्निशियन मॅनेजर डॉ. हेमंत पाटील, सिग्नेटरी अ‍ॅथॉरिटी डॉ. शिरीष गोंदणे, डॉ. विपीन तोडस, डॉ. विठ्ठल शिंदे यांच्यासह १२ जणांची टीम या प्रयोगशाळेत कार्यरत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news corona rapid test available patil hospital