पोर्टल बंद अन् लसीकरण ‘हँग’; ज्येष्ठ नागरिक ताटकळत 

राजु कवडीवाले
Tuesday, 2 March 2021

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांसह दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना ठरवून दिलेल्या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

यावल (जळगाव) : साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ६० वर्षादरम्यानचे दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला सोमवारपासून (ता. १) सुरवात झाली खरी, मात्र आरोग्य विभागाचे पोर्टल वारंवार बंद पडत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन् तास येथील ग्रामीण रुग्णालयात थांबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्हाभर असून, सर्वत्र ज्येष्ठांचे हाल होत आहेत. 
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांसह दीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना ठरवून दिलेल्या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याप्रमाणे नोंदणी झालेल्या व्यक्ती येथे ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी गेल्यास बहुतेकदा आरोग्य विभागाचे पोर्टल बंद पडलेले असते. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जात नाही, तोपर्यंत लसीकरण होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांना तांत्रिक कारणामुळे ताटकळत राहावे लागत आहे. 

पहिल्‍या दिवशीही पोर्टल पडले बंद
सोमवारी (ता. १) पहिल्याच दिवशी दुपारी एक दीड तास पोर्टल बंद पडले होते. आजही दुपारी साडेबारापासून बंद पडलेली साइट दुपारी पावणेतीनपर्यंत बंद होती. दहा मिनिटांसाठी सुरू झालेली साइट पुन्हा बंद पडली. परिणामी, शहरासह बाहेरगावाहून आलेल्या जेष्ठ नागरिकांना ऐन उन्हात रुग्णालयात ताटकळत बसावे लागले. शासनाने लसीकरणासाठी ऑनलाइनसह ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे. 

तहसीलदारांनाही फटका 
येथील तहसीलदार महेश पवार यांना देखील वारंवार बंद पडणाऱ्या पोर्टलचा फटका बसला असून, दोन वेळा साइट बंद असल्यामुळे तिसऱ्या फेरीत त्यांचे लसीकरण झाले. सोमवारी २८ जणांना प्रथम, तर २८ जणांना दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आला. मंगळवारी दुपारी तीनपर्यंत ३१ जणांना प्रथम तर ९ जणांना दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आला. दुपारी तीन नंतर साइट पुन्हा सुरू झाली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news corona vaccine system hang senior citizens staring