esakal | हाऊसफुल्‍ल असणाऱ्या सिनेमागृहांची ही अखेरची घरघर तर नसावी..

बोलून बातमी शोधा

cinema theater}

देखभाल-दुरुस्तीचा खर्च, त्यावर अवलंबून हजारो कामगारांची उपासमार या सर्व समस्यांना चालकांनी कसेबसे तोंड दिले. या भीषण स्थितीत सिनेमागृहांना अखेरची घरघर लागली. 

हाऊसफुल्‍ल असणाऱ्या सिनेमागृहांची ही अखेरची घरघर तर नसावी..
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षात तब्बल आठ- दहा महिने बंद राहिल्यानंतर चित्रपटगृहांना अखेरची ‘घरघर’ लागली. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात सिनेमागृह ५० टक्के उपस्थितीच्या निर्बंधासह कसेबसे सुरू झाले. मात्र दोन महिन्यांत पुन्हा ते बंद करण्याचे आदेश आल्याने या व्यवसाय क्षेत्रातील हजारो घटकांवर उपासमारीची वेळ आलीय. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २२ मार्चपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून, या निर्बंधात बार, हॉटेल, बाजार गर्दी होऊन सुरू असताना आधीच किरकोळ प्रेक्षकांची हजेरी असताना सिनेमागृह व्यवसायानेच काय गुन्हा केलाय, असा प्रश्‍न सिनेमागृहमालक, चालक व कामगार करत आहेत. सिनेमागृहांचा मोठा डोलारा, त्यावरील देखभाल-दुरुस्तीचा खर्च, त्यावर अवलंबून हजारो कामगारांची उपासमार या सर्व समस्यांना चालकांनी कसेबसे तोंड दिले. या भीषण स्थितीत सिनेमागृहांना अखेरची घरघर लागली. 

पुन्हा बंदमुळे अवकळा 
आठ-दहा महिने सिनेमागृह बंद राहिल्यानंतर दोन-तीन महिन्यांपासून ती कशीबशी सुरू होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा चित्रपटगृह बंदचा आदेश आहे. वास्तविक, कुठल्याही सिंगल स्क्रीन अथवा मल्टिप्लेक्सगृहात किरकोळ प्रेक्षकांसह सिनेमा सुरू होते. तरीही पुन्हा या सिनेमागृहांवर बंदचे आदेश लागू झाल्याने या व्यवसायावर अवकळा पसरली आहे. 
 
देखाभालीवर हजारोंचा खर्च 
सिनेमागृह बंद राहिले तर त्यापासून उत्पन्न शून्य असते. परंतु बंद स्थितीतही त्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी दरमहा हजारोंचा खर्च होतो. सिनेमागृह बंद राहिले तरी सरासरी पाच-सात हजार रुपये वीजबिल येते. त्याच्या स्वच्छतेसाठी दरमहा दहा हजारांचा खर्च होतो. याशिवाय व्यावसायिक स्वरूपाचा मालमत्ता करही भरावा लागतो. अशा स्थितीत सांस्कृतिक ठेवा असलेले हे सिनेमागृह कसे तग धरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 
बार, बाजारात गर्दी 
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लावताना शाळा, महाविद्यालय, शिकवण्यांवर पूर्ण बंदचे आदेश दिलेत. पण बाजार, व्यापारी संकुले, मार्केट कमिटी, बिअर बार, हॉटेलवर दररोज प्रचंड गर्दी होते. त्या मुळे कोरोना पसरत नाही का? की सिनेमागृहात सर्व प्रकारची काळजी घेऊन अगदीच तुरळक प्रेक्षक असताना कोरोना कसा पसरतो, असा प्रश्‍न सिनेमागृहमालक, चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. 
 
सिनेमागृह सुरू झाल्यापासून आम्ही अगदीच तुरळक प्रेक्षकांसह चालवतो व त्यासंबंधी सर्व काळजी घेतो. बाजार, बार, हॉटेल्समध्ये प्रचंड गर्दी होते. मग सिनेमागृहात रोज २५-३० पेक्षा अधिक प्रेक्षक नसताना बंदचे आदेश म्हणजे केवळ आमच्यावरच हा अन्याय आहे. 
-महेंद्र लुंकड, अध्यक्ष, चित्रपटगृहचालक-मालक संघटना 

संपादन ः राजेश सोनवणे