स्‍मशानभुमीत लाकडच संपले..मृतदेह दहनासाठी करावी लागतेय प्रतीक्षा

corona dead body
corona dead body

पाचोरा (जळगाव) : शहर व परिसरात कोरोना संसर्गाने कहर केला असून दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. यामुळे रूग्ण संख्येसह मृत होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील एकमेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे लाकडांचा ही तुटवडा जाणवत असून उपलब्ध असतील तेवढ्या लाकडांचा वापर करून मृतदेह दहन केले जात आहेत. या विदारक चित्रांमुळे कोरोनाबाबतची भीती अधिकच वाढली आहे.
पाचोरा शहर व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या व पर्यायाने मृतांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. येथे खासगी व सरकारी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून ग्रामीण भागातील तसेच येथून जवळच असलेल्या मराठवाडा भागातील रुग्ण मोठ्या संख्येने पाचोरा येथील रुग्णालयात भरती होत उपचार घेत आहेत. त्यातच रेमडीसिवर इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने व खासगी आणि सरकारी कोवीड सेंटरमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा भासत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचा संतप्त सूर व्यक्त केला जात आहे.

लॉकडाउन पण साखळी तुटलीच नाही
कोरोना संसर्गाच्या उपाय योजना संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी कंबर कसली असून युद्धपातळीवर योग्य ती साधनसामुग्री, औषधी, इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशीच थेट संपर्क केला आहे. रुग्णसंख्या तीन हजारच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित व विलगीकरणात असलेले बहुतांश रुग्ण राजरोसपणे भटकत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसात दोन वेळा तीन- तीन दिवस लॉकडाऊन करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वच दुकानदारांची कोरोना चाचणी करण्यात आली असली तरी मास्कचा वापर गांभीर्याने केला जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रोज वीस मृतदेहांचे दहन
खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणेकडूनच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील मृतदेहही पाचोरा येथील बाहेरपूरा भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून दररोज सरासरी वीस मृतांवर दहन विधी केला जात आहे. स्मशानभूमीत तेवढी जागा नसल्याने मोकळ्या जागेत मृतदेह दहन केले जात आहेत. 

त्‍यात आता लाकडांचाही तुटवडा
दहन विधीसाठी लाकूड मोठ्या प्रमाणात लागत असल्याने लाकडाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीतील लाकडाचा ठेका घेत असलो; तरी अशी भयंकर परिस्थिती या आठ- दहा दिवसांमध्ये अनुभवायला मिळाली असल्याचे ठेकेदार भोई यांनी स्पष्ट केले. स्मशानभूमीत आलेल्या मृतांच्या दहनासाठी दररोज तीन ट्रॅक्टर लाकूड लागत असल्याने एवढे लाकूड रोज आणावे कोठून? या विवंचनेत ठेकेदार आहे. तसेच मृतदेह दहन करण्यासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी दोन ते तीन तासांचे वेटिंग करावे लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृताच्या नातलगांना स्मशानभूमीत थांबावे लागत आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com