सीटी स्कॅन स्कोअर सातपेक्षा कमी असूनही इंजेक्शनचा मारा; रेमडेसिव्हिरचा अतिरेकी वापर  

remdesivir
remdesivir
Updated on

जळगाव : जिल्ह्यासह राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, त्यासाठी रुग्णांचे नातलग वणवण भटकत आहेत. मात्र, असे असताना जळगाव जिल्ह्यात या इंजेक्शनचा अतिरेकी वापर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा सीटी स्कॅनचा स्कोअर सौम्य म्हणजे सातपेक्षा कमी असेल तरीही सर्रास रेमडेसिव्हिर डोसेज‌चा मारा होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. 
फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढू लागले आणि मार्चमध्ये संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गेल्या दीड महिन्यातच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडेअकरा हजारांवर पोचली आहे. त्यात ऑक्सिजन व आयसीयूतील गंभीर रुग्णांची संख्याही दोन हजारांपेक्षा अधिक आहे. 

रेमडेसिव्हिरचा वापर 
‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशानुसार रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोनावरील योग्य उपचार नसला तरी फुफ्फुसातील संसर्ग ते कमी करण्यात सहाय्यभूत ठरत असल्याने त्याचा वापर सर्रास केला जात आहे आणि हे इंजेक्शन उपयुक्तही ठरत आहे. 

अतिरेकी वापराचे प्रकार 
हे इंजेक्शन उपयुक्त ठरत असले तरी ‘आयसीएमआर’ने कोरोनाबाधित कोणत्या स्वरूपाच्या रुग्णांना ते द्यावे, याबाबतही मार्गदर्शन केले आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात या इंजेक्शनचा वापर अतिरेकी पद्धतीने केला जात आहे. सीटी स्कॅनचा स्कोअर सौम्य म्हणजे सातपेक्षा कमी असेल तरीही रेमडेसिव्हिर डोसेज‌चा मारा केला जात आहे. अगदी घरी विलगीकरणात असलेल्या सौम्य लक्षणांच्या रुग्णांनाही काही डॉक्टर रेमडेसिव्हिर देत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. रेमडेसिव्हिरचा वापर केव्हा, कोणत्या रुग्णांवर व कोणत्या स्थितीत करावा, याबाबत आयसीएमआरचे दिशानिर्देश आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात सातपेक्षा कमी स्कोअर असला, रुग्णाला सहव्याधीही (कोमॉर्बिड) नसतील, तो तरुण असेल तरीही रेमडेसिव्हिर दिले जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. 
 
कोणत्या स्थितीत वापरावे रेमडेसिव्हिर? 
कोरोनाबाधित रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये किती संसर्ग झाला आहे, याची ‘एचआर सीटी स्कॅन’द्वारे तपासणी केली जाते. फुफ्फुसाची २५ भागांत विभागणी करून कोरोनामुळे त्यात २५ भागांपैकी किती भाग संसर्गित झाला त्याला कोरॅड-स्कोअर म्हटले जाते. हा स्कोअर एक ते आठ असला तर ते सौम्य, आठ ते १५ असेल तर साधारण (मॉडरेट) आणि १५ पेक्षा जास्त असेल तर तीव्र असतो. ज्यांचा स्कोअर नऊपेक्षा अधिक व त्या रुग्णांना सहव्याधी असतील तर डॉक्टर आवश्‍यकतेनुसार रेमडेसिव्हिर वापरू शकतात. 
 
आयसीएमआरचे रेमडेसिव्हिर वापराबाबत स्पष्ट दिशानिर्देश आहेत. त्यानुसार सीटी स्कॅनचा स्कोअर नऊपेक्षा अधिक असेल अशा रुग्णांना त्यांची एकूणच शारीरिक स्थिती पाहून रेमडेसिव्हिर देता येईल. स्कोअर नऊपेक्षा कमी मात्र रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासत असेल तर अशा अपवादात्मक स्थितीत रेमडेसिव्हिर देण्यास हरकत नाही. 
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

संपादन– राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com