esakal | आदेशाच्या प्रतीक्षेत दुकानांबाहेर व्यापाऱ्यांचा ठिय्या 

बोलून बातमी शोधा

jalgaon lockdown

जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून अत्यावश्‍यक दुकाने वगळता इतर दुकानांवर र्निबंध आणले आहेत. यामुळे केवळ अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, दूध, मेडिकल, भाजीपाला, फळे, हॉस्पिटल सुरू आहेत. इतर दुकाने मात्र बंदच आहेत. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांवर गदा आली आहे.

आदेशाच्या प्रतीक्षेत दुकानांबाहेर व्यापाऱ्यांचा ठिय्या 
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : शासनातर्फे संपूर्णतः लॉकडाऊनबाबत आज निर्णय होणार आहे. त्यात लॉकडाऊन आजपासून किंवा पंधरा एप्रिलपासून असा निर्णय होणार होता. त्याआदेशाच्या प्रतीक्षेत आज शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानासमोर येऊन ठिय्या केला. केव्हा एकदाचा संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचा आदेश येतो, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून होते. दुकाने सुरू की बंद याबाबत व्यापाऱ्यांमध्ये आजही संभ्रम होता. 

जिल्हा प्रशासनाने ५ एप्रिलपासून अत्यावश्‍यक दुकाने वगळता इतर दुकानांवर र्निबंध आणले आहेत. यामुळे केवळ अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, दूध, मेडिकल, भाजीपाला, फळे, हॉस्पिटल सुरू आहेत. इतर दुकाने मात्र बंदच आहेत. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांवर गदा आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेने शासनाला ७२ तासांचा अवधी देत गेल्या मंगळवारी (ता.७) संपूर्णतः लॉकडाऊनचा निर्णय घेणार असाल तरच दुकाने बंद ठेवू अन्यथा शुक्रवारपासून व्यापारी रस्त्यावर येऊन आदेशाला न जुमानता दुकाने सुरू करतील असा इशारा दिला होता. त्यावर शासनाने सर्व पक्षीय बोलावून संपूर्णतः लॉकडाऊन घेण्याबाबत मते जाणून घेतली. दरम्यान शुक्रवारी रात्री ८ पासूनच विकेंड लॉकडाउनला सुरवात झाली. तो लॉकडाऊन आज सकाळी आठपर्यंत कायम होता. काल शासनाने टास्क फोर्सची बैठक बोलावत संपूर्णतः लॉकडाऊन बाबत मते जाणून घेतली. आज दुपारी पुन्हा त्याचविषयावर बैठक होणार आहे. त्यात संपूर्णतः लॉकडाऊन केव्हापासून करायचे, कसे करायचे याचा निर्णय घेणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले र्निबंध कायम असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मात्र शासन काय निर्णय देतो यावर दुकाने सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानासमोर बस्तान मांडत आदेशाची वाट पाहत आहेत. 

व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
शहरात कोरोनाचे संक्रमण व मृत्युचे प्रमाण खुप वाढत आहे, अशा परिस्थितीत संक्रमण चेन तोडण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी मानवतावादी धोरण ठेउन शासनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शाह, राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी केले आहे. 
 
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय 
संपूर्ण लॉक डाऊन बद्दल राज्य शासनाचा टास्क फोर्सची आज मिटिंग आहे. त्यांचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्वानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाप्रमाणे शहरातील व्यापारी सुरू असतील. शासनाचे निर्णय आल्यावर सर्वानुमते योग्य निर्णय घेण्यात येईल.