टेस्टिंग कमी झाल्याने रुग्णसंख्याही घटली; पण लग्न, बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी 

देवीदास वाणी
Sunday, 27 December 2020

जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभ, बैठका, बाजारपेठांमधील दुकानांमध्ये पन्नासपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती नको, अशी अट टाकली आहे.

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोना टेस्टिंगची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने रुग्णसंख्याही कमी होत असल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातून केला जात आहे. महिनाभरापासून नवीन कोरोना रुग्ण आढळण्याच्या संख्येत घट होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा करीत आहे. मात्र जेव्हा चाचण्या वाढतात, तेव्हा रुग्ण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही समोर येते. त्यावरून पॉझिटिव्हचा रेट ठरतो. मुळात शासकीय यंत्रणेकडूनच कोरोना टेस्टिंग कमी झाल्या आहेत. टेस्टिंग कमी झाल्यातर साहजिकच रुग्णसंख्या कमी होईलच. 
दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभ, बैठका, बाजारपेठांमधील दुकानांमध्ये पन्नासपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती नको, अशी अट टाकली आहे. मात्र लग्न समारंभ, आंदोलन, सभांमध्ये शंभर ते हजारांवर नागरिकांची उपस्थिती असते. बैठकीत सामाजिक अंतर पाळले जात नाही, तोंडाला अनेक जण मास्क बांधत नाहीत. सॅनिटाइझचा वापर केला जात नाही. त्यामुळे साहजिकच आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. 

अधिकारी परवानगी देण्यात
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केलेल्या नियमावर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी कोठे होते, याचा तपास जिल्हा प्रशासनाने, महापालिका, पालिका प्रशासनाने केल्यास सत्य समोर येईल. मात्र जिल्हा प्रशासन आदेश काढण्यात व्यस्त अन् अधिकारी केवळ परवानगी देण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. आदेशाची अंमलबजावणी कोठे होत आहे, असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus testing and patient figar down