आठ तालुके निरंक‍; जिल्‍ह्यात २४ नवे बाधित

राजेश सोनवणे
Saturday, 26 December 2020

जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालानुसार जिल्‍ह्‍यात आज देखील दिलासादायक चित्र राहिले. आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण २४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जळगाव : एकीकडे कोरोनाचा दुसरा विषाणूचा संसर्ग पसरत असल्‍याची भिती आहे. त्‍या दृष्‍टीने प्रशासनाची देखील तयारी आहे. परंतु, जिल्‍ह्‍यात कोरोनाचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. आज दिवसभरात अवघे २४ नवीन रूग्‍ण आढळून आले असून, यात आठ तालुक्‍यांमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नसल्‍याचा अहवाल आहे.
जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालानुसार जिल्‍ह्‍यात आज देखील दिलासादायक चित्र राहिले. आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण २४ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. विशेष म्‍हणजे जिल्ह्यातील आठ तालुक्याचा अहवाल निरंक असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

४१६ रूग्‍ण घेताय उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ५५ हजार ६२१ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५३ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आजच्या बाधितांसह एकूण ४१६ बाधित रूग्ण विविध ठिकाण उपचार घेत आहे. तसेच जिल्‍ह्‍यासाठी अधिक दिलासादायक बाब म्‍हणजे सलग चौथ्‍या दिवशी एक देखील रूग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्‍याचे जिल्हा कोविड रूग्णालयाच्या प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर– ८, जळगाव ग्रामीण- १, भुसावळ- ४, अमळनेर- २, चोपडा- ३, धरणगाव- १, यावल- २, पारोळा- ३ असे एकुण २४ बाधित रूग्ण आढळले आहे. तर पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुका निरंक आढळून आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update eight taluka no patient