
दिलासा पण गाफिलता नको; नव्या बाधितांची संख्या आठशेच्या टप्प्यात
जळगाव : जिल्ह्यात मे महिन्याची सुरवात कोरोना संसर्गाच्या बाबतीत सुखावह झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवे रुग्ण हजाराच्या आत नोंदले गेले. सोमवारी अवघे ८०२ रुग्ण आढळले, तर बरे होणाऱ्यांचा आजचा आकडा १०९९ होता. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा ९० टक्क्यांवर गेला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती सकारात्मकपणे बदल आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर होती. मात्र, चार दिवसांपासून ती सातत्याने कमी होत असून बरे होणाऱ्यांचा आकडा वाढतोय. गेल्या महिनाभरात प्रथमच रुग्णसंख्या आठशेच्या टप्प्यात आली असून सोमवारी नोंदलेल्या ८०२ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या १ लाख २४ हजार ६४६ झाली आहे. तर १०९९ रुग्ण दिवसभरात बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १२ हजार ३५६ झाला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट या लाटेत प्रथमच ९०.१४ टक्क्यांवर पोचला आहे. असे असले तरी चाचण्यांची संख्याही रोडावली. सोमवारी ६ हजार ४३१ चाचण्यांचेच अहवाल प्राप्त झालेत.
मृत्यूसत्र कायम
असे असले तरी जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम आहे. सोमवारी ३५ वर्षीय महिलेसह १९ जणांचा बळी गेला, एकूण बळींचा आकडा २२३५वर पोचला आहे. तर नॉन कोविड, सारी, कोविडनंतरची व्याधी आदींमुळे १२ मृत्यू झाले.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात सोमवारी १७१ रुग्ण आढळून आले. मात्र दिवसभरात २०५ रुग्ण बरेही झाले.
अन्य ठिकाणचे रुग्ण : जळगाव ग्रामीण ६४, भुसावळ ६९, अमळनेर २४, चोपडा ४४, पाचोरा २८, भडगाव १०, धरणगाव २०, यावल १९, एरंडोल ७३, जामनेर ५७, रावेर ६४, पारोळा १५, चाळीसगाव ६९, मुक्ताईनगर २३, बोदवड २६, अन्य जिल्ह्यातील १६.
Web Title: Marathi Jalgaon News Coronavirus Update New Positive Case Ratio
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..