esakal | धक्‍कादायक..फेकलेल्या मास्कचा होतोय असा वापर; गादीत कापसाऐवजी मास्‍क

बोलून बातमी शोधा

mask use

कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर केला जात आहे. प्रत्‍येकजण मास्‍क वापरत असून वापरून झालेले मास्क उघड्यावर फेकून दिले जातात. परंतु, या मास्‍कचा वापर स्‍वतःच्या फायद्यासाठी करून घेताय पण दुसऱ्याच्या जीवाची पर्वा केली जात नसल्‍याचा धक्‍कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला.

धक्‍कादायक..फेकलेल्या मास्कचा होतोय असा वापर; गादीत कापसाऐवजी मास्‍क
sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : शहरापासून जवळ असलेल्‍या कुसूंबा नाका परिसरामधील महाराष्ट्र गादी भांडार येथे गादी बनविण्यासाठी वापरून फेकलेल्‍या मास्कचा केला जात असल्‍याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून महाराष्ट्र गादी भांडारचा मालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर, जळगाव) यास अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिासत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्‍क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशासनाच्या देखील तशा सुचना आहेत. मास्‍कचा वापर झाल्‍यानंतर तो फेकला जातो. मात्र हे फेकलेले मास्‍क जमा करून त्‍याचा वापर गादी भरण्यासाठी केला जात असल्‍याचे उघडकीस आले आहे. 

पोलिस पाटलाची तक्रार अन्‌
नागरिकांनी वापरलेल्या मास्कचा वापर करुन कुसूंबा नाक्याजवळ हॉटेल कृष्णा गार्डनच्या मागे महाराष्ट्र गादी भांडार येथे गादी बनविण्यात येत असल्याची माहिती कुसूंबा येथील पोलीस पाटील रा‍धेश्‍याम चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्‍वर डापकर, शांताराम पाटील यांनी महाराष्ट्र गादी भांडार गाठले. याठिकाणी पाहणी केली असता मिळालेल्या माहितीनुसार गादी भांडार येथे नागरिकांनी वापरलेल्या मास्कपासून गादी बनविण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. 

आणखी मास्‍क पडून
एक गादी बनविल्‍यानंतर देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मास्क पडलेले दिसून आले. सदर प्रकाराबाबत गादी भांडारचे मालक अमजद अहमद मन्सुरी यास विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मालक अमजद मन्सुरी यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कोरोनाचा संसर्ग वाढवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सिध्देश्‍वर डापकर यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे हे करीत आहेत.